|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बोगस सातबाराप्रकरणी वेळंबचा तलाठी निलंबित

बोगस सातबाराप्रकरणी वेळंबचा तलाठी निलंबित 

गुहागर / प्रतिनिधी

स्वतः जमीन खरेदी करताना शेतकरी असल्याचा दाखला जोडण्यासाठी चक्क दुसऱयाच्या सातबाऱयावर आपले नाव लावून बोगस सातबारा तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात वेळंबच्या तलाठी स्वेजल संभाजी पोलादे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार सौ. वैशाली पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

तलाठी स्वेजल पोलादे यांनी 20 ऑगस्ट 2016 रोजी पोमेंडी येथील भूमापन गट क्र. 1796, क्षेत्र 0-53-8 ही जागा खरेदी करताना शेतकरी असल्याचा पुरावा देताना चिपळूण तालुक्यातील कळकवणे येथील चंद्रकांत राजाराम शिंदे यांच्या मालकीच्या भूमापन क्र. 12, शेतीचे नाव खैराट या सातबाऱयावरील शिंदे यांचे नाव काढून त्या ठिकाणी तलाठी स्वेजल पोलादे यांनी संगणकावरून स्वत:चे नाव टाकले. अशा प्रकारचा बोगस सातबारा बनवताना त्या सातबाऱयावर स्वतः सही करत कळकवणे, ता. गुहागर असा शिक्का मारला. मुळात गुहागर तालुक्यात कळकवणे हे गावच नाही. कळकवणे गाव हे चिपळूण तालुक्यातील आहे. दरम्यान शेतकरी असल्याचा बोगस सातबारा तयार करून जमिनीचे खरेदीखत केले. खरेदीखताप्रमाणे पाटपन्हाळेचे सर्कल अधिकारी यादव यांच्याकडे नोंद घालावयास दिल्यावर कागदपत्राची तपासणी करताना शेतकरी असल्याचा पुरावा देतानाच बोगस सातबारा त्यांच्या निदर्शनास आला. यातच एका सुजाण व्यक्तीने खरेदी खत, बोगस सातबाऱयासह सबळ पुरावे जोडून तहसीलदारांकडे या प्रकरणाबाबत निनावी तक्रार दाखल केली.

त्यानंतर चिपळूणच्या प्रांताधिकाऱयांनी तक्रार दाखल करून घेत याची चौकशी सुरू केली. तलाठी व सर्कल अधिकाऱयांचे जाबजबाब घेतले. या जाबजबाबानंतर तलाठी स्वेजल पोलादे यांचे प्रथम निलंबन केले. त्यानंतर तहसीलदारांना तलाठी पोलादे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश चिपळूण प्रांताधिकाऱयांनी दिला होता. त्याप्रमाणे गुरूवारी रात्री 9.42 वाजता येथील पोलीस स्थानकात तहसीलदार सौ.वैशाली पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तलाठी स्वेजल पोलादे यांनी जमीन खरेदी करताना खोटे व बनावट सातबारा तयार करून तलाठी सजा कळकवणे, ता. गुहागर असा शिक्का मारून शेतकरी असल्याचा खोटा पुरावा निर्माण केला. आणि आपल्या तलाठीपदाचा गैरवापर करून दस्त क्र. 621/2016 दि. 30 ऑगस्ट 2016 खरेदीखत करून शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी स्वेजल पोलादे यांच्यावर भादंवि कलम 467, 468, 470, 471, 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव करत आहेत.