|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जोरदार वाऱयासह पावसाचे पुन्हा आगमन

जोरदार वाऱयासह पावसाचे पुन्हा आगमन 

प्रतिनिधी / बेळगाव

जोरदार वाऱयासह गडगडाट व गारांच्या प्रचंड माऱयासह वळीवाने शुक्रवारी शहराच्या काही भागासह उपनगरांना चांगलेच झोडपले. सुमारे अर्धा ते एक तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. सायंकाळी 7 च्या सुमारास ढगांनी आकाशात गर्दी केली व 8 च्या सुमारास प्रचंड गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता. मात्र सुरुवात झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. चांगला पाऊस पडल्यामुळे शहर वासीयांतून समाधान व्यक्त होत असून आणखीन् काही दिवस असाच पाऊस पडला तर शहराच्या अंतर्गत पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच अजून मोठय़ा पावसाची अपेक्षा आहे.

शहरासह टिळकवाडी, अनगोळ, भाग्यनगर, वडगाव, शहापूर, उद्यमबाग परिसरात एक ते दीड तास मोठा पाऊस पडला. जोरात आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले.  याचबरोबर गटारींमधील कचरा रस्त्यांवर आल्याने उपनगरांमध्ये ठिकठिकाणी कचऱयाचे ढिग साचल्याचे दिसून आले. पावसाचा जोर शहराच्या सर्रास भागात एक सारखाच होता. घरी परतण्याच्या घाईगडबडीत असतानाच पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे अनेकांना आडोशाला ताटकळत थांबावे लागले.

 दोन दिवसांपासून उष्म्यात आणखी वाढ होवून पारा 38 अंशावर गेला होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गर्मीचा सामना करावा लागत होता. मात्र सायंकाळच्या सुमारास आकाशात मोठय़ा प्रमाणात ढग जमले व जोरदार गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. यात गाराही पडल्या.

बाजारपेठेवरही परिणाम

जोरदार पावसामुळे बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झाला. फेरीवाले व भाजी विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आपला व्यवसाय आटोपून घरी परतत असतानाच पावसाने झोडपण्यास सुरुवात केल्यामुळे अनेकांची धावपळ उडाली. छत्री किंवा रेनकोट नसताना घराबाहेर पडलेल्या मंडळींनाही आसरा शोधावा लागला. तर काहींनी भिजतच घरी जाणे पसंत केले. तसेच अनेक भागात अधिक प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहन धारकांना रस्त्यातून जाताना कसरत करावी लागली.

शेतकऱयांना थोडा दिलासा

शहरासह तालुक्मयातील कडोली, काकती, होनगा, कणबर्गी, कलखांब, मुचंडी, बसवनकुडची यासह इतर भागातही पाऊस झाला. यामुळे शेतकऱयांना थोडा दिलासा मिळाला आहे. पण शेतकऱयांतून अजूनही मोठय़ा पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. जोरदार वाऱयामुळे तालुक्मयातील काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता.

Related posts: