|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कूपनलिकांत डोकावताहेत मुले

कूपनलिकांत डोकावताहेत मुले 

वार्ताहर/   एकसंबा

सध्या सर्वत्र पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होताना दिसत आहे. अशा अवस्थेत शासनाच्यावतीने योग्य उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचा फायदा व्हावा याची काळजी घेण्यात येत आहे. पण त्याची अमलबजावणी करताना स्थानिक पातळीवरील अधिकाऱयांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. झुंजरवाड (ता. अथणी) येथे धोकादायक कूपनलिकेमुळे चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना नणदी (ता. चिकोडी) येथील धोकादायक कूपनलिका अद्यापही उघडय़ावरच असल्याचे दिसत आहे. त्यातील विठ्ठल मंदिरनजीकच्या धोकादायक कूपनलिकात लहान मुले डोकावत आहेत. त्यामुळे  गावातील धोकादायक कूपनलिका लहान मुलांच्या जीवावर बेतणाऱया ठरत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

नणदी येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही वर्षापूर्वी विठ्ठल मंदिर व परिसरात अनेक कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावात पाण्याची सोय झाली. पण सध्या मंदिरानजीकची कूपनलिका बंद पडल्याने ती उघडय़ावरच आहे. अगदी लोकवस्तीमध्ये असणाऱया धोकादायक कूपनलिकेमुळे जीवितहानी होण्याची वाट संबंधित अधिकारी पाहत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

झुंजरवाड येथे धोकादायक कूपनलिकेत पडून कावेरी मादर या चिमुकलीचा अंत झाला. त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने उघडय़ा कूपनलिका बुजविण्याचे  तसेच धोकादायक कूपनलिकांना कूंपन अथवा झाकन बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाली आहे. पण नणदी येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱयांनी शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार व्हावा

नणदी गावात ग्रामपंचायतीच्या 25 कूपनलिका आहेत. त्यापैकी 15 कूपनलिका चालू तर उर्वरित 10 बंद आहेत. 10 पैकी काही कूपनलिकांच्या मोटारीही काढल्या आहेत. त्या ठिकाणी पाणी नसल्याने मोटारी काढलेल्या कूपनलिकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन त्या कूपनलिका बुजविण्याची गरज आहे. पण तसे न केल्याने सध्या धोकादायक कूपनलिकांत लहान मुले डोकावत आहेत. या परिस्थितीत जीवितहानी होण्याआधी धोकादायक कूपनलिका बुजविण्याची गरज आहे.

प्रशासनाने पाहणी करावी

झुंजरवाड येथील घटनेनंतर जिल्हा व तालुका प्रशासन कामाला लागले आहे. पण  ग्राम पातळीवरील प्रशासनापर्यंत आदेश पोहोचत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. जिल्हाधिकाऱयांच्या दरबारातून आदेश आला तरी ग्रामीण भागातील परिस्थिती जैसे थे आहे. यामुळे जिल्हा, तालुका प्रशासनाने ग्रामीण भागाची पाहणी करणे गरजेचे आहे.  

प्रतिक्रिया

संबंधितांना नोटीस पाठविणार

नणदी ग्रामपंचायत क्षेत्रामधील सर्व कूपनलिकांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यात धोकादायक कूपनलिका बुजविण्यात येणार आहेत. धोकादायक अवस्थेत कूपनलिका ठेवणाऱयांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीत येणाऱया धोकादायक कूपनलिका त्वरित बुजविण्यात येणार आहेत. चालू असलेल्या कूपनलिकांच्या माधमातून पाणी नसणाऱया ठिकाणी पाणी पोहाचविण्याची   सोय करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाक्षी हवालदार यांनी सांगितले.

Related posts: