|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जवान विशाल लोहारवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

जवान विशाल लोहारवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार 

वार्ताहर / खानापूर

खानापूर तालुक्यातील निडगल गावचा जवान विशाल पांडुरंग लोहार याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत जवानास श्रद्धांजली वाहण्यासाठी परिसरातील लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे लष्कराकडून स्पष्ट न झाल्याने नागरिकांनी काही वेळ मृतदेह रोखून धरला होता. तहसीलदार व पोलीस अधिकाऱयांनी समजूत काढल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशाल लोहार याचा मृतदेह शाळेच्या पटांगणापासून फुलांनी सजवलेल्या ट्रक्टरमधून ‘जवान विशाल अमर रहे’ च्या घोषणा देत त्याच्या घरापर्यंत आणण्यात आला. तेथे धार्मिक विधी झाल्यानंतर गावाजवळील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने माजी आमदार दिगंबर पाटील, युवा कार्यकर्ते यशवंत बिर्जे, ता. पं. समिती सभापती नंदा कोडचवाडकर, सदस्य पांडुरंग सावंत, मार्केटिंगचे चेअरमन गोपाळ पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, तसेच माजी सैनिक संघटनेचे जयराम पाटील, अमृत पाटील, माजी सैनिक आर्मीनेही एअरफोर्स संघटनेचे गोपाळ देसाई यांच्यासह गावातील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.

14 वर्षे सेवेत

जवान विशाल लोहारची एक हुशार व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख होती. विशाल व त्याचा भाऊ दिलीप हे दोघेही लष्करात दाखल झाल्याने घराला प्रतिकूल परिस्थितीतून सावरण्यास वडील पांडुरंग लोहार यांना धीर आला होता. विशालच्या आग्रहास्तव बेळगावजवळील पिरनवाडी येथे घर बांधण्याचे स्वप्न होते. ते अधुरे राहिले. विशालने स्वयंस्फूर्तीने 14 वर्षापूर्वी लष्करात दाखल होऊन अनेक ठिकाणी सेवा बजावली. प्रारंभीचे प्रशिक्षण बेंगळूर येथे झाल्यानंतर उदयपूर येथे पहिली सेवा बजावली. त्यानंतर दिल्लीतही त्याने सेवा बजावली. कुटुंबाचा तो आधारवड बनला होता.

दोन वर्षापूर्वी त्याची राष्ट्रीय रायफल मद्रास-54 मध्ये बदली झाली होती. जम्मू-काश्मीरमधील दुर्गम भागात असलेल्या नवसिरा राजौरी येथे त्यांचे आरआर-54 मधील प्रशिक्षण संपल्यानंतर दोन दिवसात त्याची राजस्थान येथे लान्सनायक म्हणून बढतीवर बदली झाली होती. शेवटची चारच वर्षे सेवा शिल्लक होती. ती संपवून कुटुंबासमवेत सुखी जीवन जगण्याचा त्याचा मानस होता. पण दुर्दैवाने मंगळवारी राजौरी येथे तो राहत असलेल्या क्वॉर्टर्सजवळ गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती भाऊ दिलीप याने कुटुंबीयांना दिली. पण ती गोळी नेमकी कशी लागली याचे कारण कळू शकले नाही. मृतदेहाबरोबर आलेल्या अहवालातही कोणताच स्पष्ट उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून याबाबत आक्षेप घेण्यात आला. विशालच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी व भाऊ जवान दिलीप असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंत्ययात्रेला गावातील तसेच परिसरातील लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

वरिष्ठाकडून नागरिकांची समजूत

दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक संघटनेचे कार्यकर्ते तसेच तहसीलदार शिवानंद उळागडी, पोलीस निरीक्षक गुरुनाग, उपनिरीक्षक परशराम पुजेर, आदींनी कुटुंबीयांची व ग्रामस्थांची समजूत काढली. शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी अथवा लष्करातील जवानावर अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन कुटुंबीयांना न्याय देण्याची कार्यतत्परता असते. जवान विशाल लोहार याच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. यासाठी सहकार्याचे आवाहन केले. तसेच मृतदेह ताटकळत ठेवणे हे योग्य नसून अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचा पाठपुरावा करण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जमावाने अंत्यविधी प्रक्रियेला प्रारंभ केला.

मृतदेह बराच काळ रोखून धरला

जवान विशाल लोहार (वय 33) याचा जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्हय़ातील नवसिरा येथे कार्यरत असताना मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गुरुवारी विमानाने गोवामार्गे आणण्यात आल्यानंतर शुक्रवारी सकाळी 8 वाजता निडगल येथे अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला. पण मृत्यू नेमका कशामुळे झाला. याचा अहवाल मिळाला नसल्याने ग्रामस्थांनी मृतदेह बराच काळ रोखून धरला. येथील माध्यमिक शाळेच्या पटांगणावर मृतदेह आणला. त्यावेळी एक दोन जवानच उपस्थित होते. त्यांच्याकडे विशालचा मृत्यू कशामुळे झाला याचा काहीच पुरावा नसल्याने ग्रामस्थही विचलीत झाले. व वरिष्ठ लष्करी अधिकाऱयांशी संपर्क साधून मृत्यूचे कारण स्पष्ट करण्याची आग्रही मागणी केली.