|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » विराटने वेळीच आत्मपरीक्षण करावे : गावसकर

विराटने वेळीच आत्मपरीक्षण करावे : गावसकर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतील विराट कोहलीची फटक्यांची खराब निवड अतिशय चिंतेची असून त्याने याबाबत वेळीच आत्मपरीक्षण करणे क्रमप्राप्त असेल, असे स्पष्ट मत माजी भारतीय कर्णधार व ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी मांडले आहे. अवघ्या भारतीय क्रिकेटच्या गळय़ातील ताईत ठरलेला विराट सध्या मात्र बॅडपॅचमधून जात असून त्याच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचे आयपीएल स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला या हंगामात 12 पैकी तब्बल 9 लढतीत पराभव स्वीकारावा लागला असून अर्थातच गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानी फेकले गेले आहेत. अर्थात, दस्तुरखुद्द विराट देखील खराब फॉर्ममध्ये असून मागील 5 सामन्यात त्याला केवळ एकदाच 20 चा आकडा पार करता आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सनीने विराटच्या फटक्यांच्या निवडीवर चिंता व्यक्त केली आहे. विराटने या हंगामात खेळलेल्या 12 पैकी 8 सामन्यात 30.62 च्या सरासरीने 245 धावा जमवल्या असून 64 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

‘विराटने आता आरशात स्वतःला पाहावे. किंग्स इलेव्हन पंजाब व कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या लढतीत त्याने अतिशय बेजबाबदार फटके लगावत आपली विकेट जवळपास बहाल केली होती. धावा होत नाहीत, हे एकवेळ समजून घेता येईल. फलंदाजासाठी बॅड पॅच येत असतो. पण, विराटची खराब फटक्यांची निवड अर्थातच चिंताजनक स्वरुपाची आहे’, असे निरीक्षण गावसकरांनी नोंदवले.

‘विराट हा आरसीबीचा कर्णधार आहे आणि यामुळे त्याने आणखी जबाबदारीने फलंदाजी करणे अपेक्षित असते. त्याने खेळपट्टीवर ठाण मांडून राहायला हवे. फटक्यात वैविध्य राखत गोलंदाजांना किंचीतही संधी मिळणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. यापूर्वी पंजाबविरुद्ध लढतीत केवळ विराटच नव्हे तर ख्रिस गेल, डिव्हिलियर्स व सेट झालेल्या मनदीप सिंगने देखील उत्तूंग फटके लगावण्याच्या नादातच आपली विकेट गमावली होती. उत्तूंग फटके मारण्यास काहीच हरकत नाही. पण, ते सीमापार जाऊ शकत नसतील तर त्याचे समर्थन करताच येणार नाही’, असे ते शेवटी म्हणाले.