|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘दादा’गिरीने शिवसेना संपणार नाही!

‘दादा’गिरीने शिवसेना संपणार नाही! 

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱया छगन भुजबळांचा दुसरा आसाराम झाला, नारायण राणेंना रोज वाटीभर गोळय़ा खाव्या लागतात, राज ठाकरेंची काय अवस्था आहे. असा सवाल करीत सत्तेच्या ‘दादा’गिरीने शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेले आणखी कोण ‘दादा’ असतील तर ते सगळे संपतील असा खणखणीत इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता दिला. शिवसेनेचा विस्तार करताना कोण आडवा येईल त्याची जिरवा, शिवसेनशी प्रामाणिक रहा. असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या 31 व्या वर्धापनदिनानिमित्त आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी मंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते. शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाटय़गृहात कार्यक्रम झाला.

अत्याचाराविरेधात खंबीरपणे लढा

शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा खडतर प्रवास, शिवसैनिक आणि भविष्यातील शिवसेनेच्या वाटचालीवर चौफेर टोलेबाजी करीत मंत्री पाटील यांनी शिवसैनिकांत उत्साह भरला. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात खंबीरपणे लढा असे आवाहन केले. ज्याच्यावर गुन्हे दाखल नाहीत तो शिवसैनिक नाही. हिच खरी शिवसेनेचे ओळख आहे. मराठी माणसांच्या हितासाठी शिवसैनिकांची अशी ओळख झाल्याचा अभिमान आहे. असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले; शिवसेनेने महाराष्ट्राला आजपर्यंत भरभरून दिले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्र छायेखाली अनेकजण मोठे झाले. बाळासाहेबांनी शिवसैनिक म्हणून अनेकांना संधी दिली. सायकल चोर नारायण राणे राज्याचा मुख्यमंत्री झाला, महात्मा फुले मंडईत भाजी विकणारे छगन भुजबळ आमदार झाले. औरंगाबादच्या (संभाजीनगर) फुटपातवर टोपल्या तयार करणारे चंद्रकांत खैरे खासदार, माझ्यासारखा पानपट्टी चालवणारा आमदार. हे फक्त शिवसेनेतच शक्य आहे. शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना सोडण्याचा विचार करू नका

शिवसेना संपली म्हणारे अनेकजण संपले. मात्र शिवसेना आहे तिथेच आहे. शिवसेना संपवण्याची भाषा कोणी करत असतील तर त्यांच्या तिरडय़ा तयार आहेत. असा इशारा देत मंत्री पाटील म्हणाले, शिवसेना सोडण्याचा विचार करू नका, जाणार असाल तर आत्ताच जा पण इतिहासाकडे वळून बघा, नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे यांच्यासारखे बाळासाहेबांशी गद्दारी करणारे वाहून गेले.

‘दादा’गिरी तुम्हाला जमणार नाही

दादागिरी, मारामारी आमची ओळख आहे. मराठी मानसाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला हे करावे लागते. आमच्या नादाला लागू नका असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता मंत्री पाटील यांनी दिला. शिवसेना संपवण्याची सुपारी घेणारे ‘दादा’ शिवसैनिक तुम्हालाही संपवतील. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजपची महाराष्ट्राला ओळख झाली. मात्र आता त्यांना सत्तेची मस्ती आली. पैशाच्या जोरावर शिवसेना संपवण्याची भाषा करू लागले आहेत. मात्र ठिगळ लावलेल्या झेंडय़ापुढे भगवा झेंडा कधीही झुकणार नाही. येत्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेना काय आहे. हे दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

  यावेळी शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार खऱया अर्थाने शिवसेनेने चालवला आहे. आले किती, गेले किती याचा विचार न करता शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले.

  आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील जनतेने आजपर्यंत  शिवसेनेला साथ दिली आहे. गेल्या सात वर्षात जनतेच्या आरोग्य, रस्ते, पाणी या मुलभूत प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. यापुढेही आमदारकीची हॅट्रीक करण्यासाठी जनता  शिवसेनेच्या मागे राहिल असा विश्वास व्यक्त केला.

 यावेळी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आमदार वैभव नाईक, महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा वैशाली राजशेखर, उदय पोवार, परिवहन समिती सभापती नियाज खान, यशवंत भालकर, प्रतिमा उत्तुरे, राहुल चव्हाण, मंगल सांळुखे आदी प्रमुख उपस्थितीत होते.