|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » एसटी कामगारांना 52 टक्के पगार वाढ द्या

एसटी कामगारांना 52 टक्के पगार वाढ द्या 

राज्य शासकीय कर्मचाऱयांप्रमाणे एसटी कर्मचाऱयांची वेतनश्रेणी निश्चित होण्यासाठी एसटी कामगारांना सरसकट 52 टक्के पगार वाढ देण्यात यावी, अशी मागणी एसटीमधील 13 संघटनांच्या कृती समितीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. तसे निवेदनही कृती समितीने परिवहन मंत्र्यांना सादर केले आहे.

गेल्या वर्षभरात वेतन करारावर फक्त चर्चा झाली. परंतु येत्या काही दिवसांमध्ये कर्मचाऱयांची पगार वाढ होणार असून एसटीमधील 13 संघटनांच्या कृती समितीने दिलेल्या रचनात्मक आणि अभ्यासपूर्ण मागणीवर एसटी प्रशासनाला सकारात्मक विचार करण्यास भाग पाडू, असे आश्वासन यावेळी परिवहन मंत्र्यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. कृती समितीने दिलेल्या निवेदनात पगारवाढीचे निश्चित सूत्र सादर केले असून त्यामध्ये कामगारांना 31 मार्च 2016 अखेर असलेल्या मूळ वेतनात 125 टक्के महागाई भत्ता अधिक करुन सदर संपूर्ण रकमेवर सरसकट 52 टक्के पगार वाढ द्यावी, अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱयांना कमीत कमी 8 ते 10 हजारापर्यत पगारवाढ मिळू शकते, असा दावा कृती समितीने केलेला आहे. पगार वाढीबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेवून कामगारावर झालेल्या आर्थिक अन्यायाबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. परिवहन मंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस डी.आर.पाटील, महाराष्ट नवनिर्माण राज्य परिवहन कर्मचारी सेनेचे सरचिटणीस मोहन चावरे, बहुजन रा.प.अधिकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद खरात आदी 13 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोट- एसटी कर्मचाऱयांच्याबाबतीत कौटुंबिक विचार करुन आतापर्यंत मी अनेक कामगार हिताचे निर्णय घेतले. कामगारांच्या हक्काला बाधा येईल किंवा नुकसान पोहचेल, असा कुठलाही निर्णय माझ्या कारकिर्दीत झाला नाही.

दिवाकर रावते, परिवहन मंत्री तथा अध्यक्ष-एसटी महामंडळ

Related posts: