|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पारंपरिक मच्छीमारांचे हित प्रथम जपणार

पारंपरिक मच्छीमारांचे हित प्रथम जपणार 

प्रतिनिधी/ काणकोण

फिरत्या मासेविक्री वाहनामुळे स्थानिक पारंपरिक मासळीविक्रेत्या महिलांच्या मासेविक्रीवर परिणाम होत असल्याची कैफियत मत्स्योद्योगमंत्री विनोद पालयेकर हे काणकोण दौऱयावर आले असता त्यांच्याकडे या विक्रेत्यांनी मांडली. फिरते मासेविक्री वाहन रस्त्यावर कोठेही हात दाखविला तरी थांबते आणि मासेविक्री करते. या वाहनांसाठी प्रत्येक पंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात एक ठरावीक जागा ठरवून देण्यात यावी. ज्यांना फिरत्या वाहनातून मासे घ्यायचे आहेत त्या व्यक्ती सरळ त्या जागी जाऊ शकतील, अशी मागणी सदर विक्रेत्यांनी यावेळी केली.

पारंपरिक मच्छीमारांचे हित प्रथम जपले जाईल आणि नंतरच फिरत्या मासेविक्रीचा विचार केला जाईल, असे स्पष्ट आश्वासन पालयेकर यांनी त्यांना दिले. फलोत्पादन महामंडळाच्या गाडय़ांवर ज्याप्रमाणे फळभाज्यांची विक्री केली जाते त्याच धर्तीवर माशांची विक्री करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र मासे साठविण्यासाठी खास शीतगृहाची गरज आहे. ज्या ठिकाणी अशी व्यवस्था करणे सुलभ होईल त्याचा प्रथम विचार केला जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.