|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जिल्हय़ाचा करू नको समशान..

जिल्हय़ाचा करू नको समशान.. 

मालवण :

सत्तेच्या बाजारातल्या हय़ेंच्या दुकानासाठी

आपापल्या पद्धतीनं घालतंत धुमशान

‘बाबानू’ काय नाय केलात, तरी चालात

पण जिल्हय़ाचा करू नको समशान

कवी कमलेश गोसावी यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या राजकारणावर भाष्य करणारी ‘मालवणी धुमशान’ ही कविता सादर केली. या कवितेतील प्रत्येक कडव्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. मालवण नगरपालिकेच्या शतक महोत्सवानिमित्त रॉक गार्डन येथे आयोजित काव्य मैफिलीत जिल्हय़ातील कवींनी विविध कविता सादर करीत रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली.

मालवण नगरपालिकेच्या शतक महोत्सवानिमित्त पालिकेतर्फे रॉक गार्डन येथे जिल्हय़ातील कवींच्या काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व कवी अरविंद म्हापणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, नगरसेवक गणेश कुशे, बांधकाम सभापती सेजल परब, नगरसेविका पूजा सरकारे, आकांक्षा शिरपुटे, पूजा करलकर, गुरुनाथ राणे, कवी बाबला पिंटो, कमलेश गोसावी, कवयित्री सुनंदा कांबळे, राकेश तामगावकर आदी उपस्थित होते.

काव्य मैफिलीत बाबला पिंटो यांनी ‘माय, पावस, मिस इंडिया, लोकशाय, कायच कळना नाय’ या कविता सादर करीत रसिकांची दाद मिळविली. कमलेश गोसावी यांच्या ‘मालवणी धुमशान, मी सिंधुदुर्ग बोलतोय, इमर्जन्सी, सुको मिरग, मिया तेचो आरसो, पावसाची गटारी’ या कविता रसिकांच्या पसंतीस उतरल्या. सुनंदा कांबळे यांच्या ‘रामायणाची गजाल, पहिला प्रेम, पावस,’ तर अरविंद म्हापणकर यांच्या ‘आता तरी वाण्या माका पावशीत काय?’ या कवितांना रसिकांनी दाद दिली. रॉर्क गार्डन येथे संध्याकाळी पर्यटक व स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने येतात. मालवण पालिकेने सूर्यास्तानंतर या काव्य मैफिलीचे आयोजन केल्याने पर्यटक, स्थानिक नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.

Related posts: