|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केजरीवाल यांच्या मेहुण्यावर कपिल मिश्रा यांचा निशाणा

केजरीवाल यांच्या मेहुण्यावर कपिल मिश्रा यांचा निशाणा 

50 कोटीचा जमीन गैरव्यवहार केल्याचा आरोप, चौकशी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

रविवारी केजरीवाल यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांचे मेहुण्याला लक्ष्य केले आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी मध्यस्थी करून या मेहुण्याच्या जमीन गैरव्यवहारांना साथ केली. केजरीवाल यांनाही याची कल्पना आहे. पण ते त्यांच्या स्वार्थाकरीता स्वस्थ बसले आहेत, असांही गंभीर आरोप म़िश्रा यांनी केला. त्यांनी भ्रष्टाचारविरोधी कक्षाकडे केजरीवाल व अन्य नेत्यांच्या विरोधात तक्रारही सादर केली आहे.

आम आदमी पक्षाने या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. केजरीवाल यांनी कोणाकडूनही लाच घेतलेली नाही. मिश्रा यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी स्वतःची गैरकृत्ये लपविण्यासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर गलिच्छ आरोप केले आहेत, असा पलटवार नेते संजय सिंग यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

साक्षीदार होण्यास तयार

कपिल मिश्रा यांनी सोमवारी येथे भ्रष्टाचार विरोधी कक्षाच्या (एसीबी) अधिकाऱयांची भेट घेऊन त्यांना आपल्याजवळील कागदपत्रे सादर केली. आम नेत्यांच्या घोटाळय़ांची चौकशी केल्यास आपण सरकारच्या वतीने साक्षीदार म्हणून भूमिका निभावू असा दावाही त्यांनी केला. ज्या केजरीवाल यांना आपण प्रामाणिकपणाचा मूर्तीमंत आदर्श म्हणून मानत होतो, त्यांचेच हात बरबटलेले पाहून आपण स्तंभित झाला आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले.

एसीबीकडून चौकशी सुरू 

केजरीवाल आणि आपच्या अन्य नेत्यांच्या विरोधातील तक्रारी गंभीर असून त्यांची चौकशी भ्रष्टाचार विरोधी कक्षाने सुरू केली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी या चौकशीची मागणी केली असून त्याला अनुसरून ही चौकशी केली जाईल, असे कक्षाकडून सांगण्यात आले. यामुळे आपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिश्रा यांना भाजपची फूस

कपिल मिश्रा यांनी थेट केजरीवाल यांच्यावरच आरोप केल्याने कोंडीत सापडलेल्या आपने आता यासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. मिश्रा यांचा बोलविता धनी भाजपच आहे. मिश्रा भाजपच्या कहय़ात गेले आहेत. ते भाजपचीच भाषा बोलत आहेत, असा प्रतिहल्ला आपने चढवला आहे. मात्र भाजपने लगोलग याचा इन्कार केला असून आपची ही नेहमीचीच सवय आहे अशी खिल्ली उडविली आहे.

 

Related posts: