|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खासदारांवर टिका करणं अशोभनीय

खासदारांवर टिका करणं अशोभनीय 

प्रतिनिधी/ सातारा

ज्या व्यक्तीला पूर्णतः नवख्या व्यक्तीकडून निसटता विजय मिळवता आला आहे, जो पडता पडता बचावला आहे, त्याची काय योग्यता राहिली आहे हे दिसून आले आहे. स्वतःच्या वॉर्डात अनेक वर्षाच्या समस्या ज्याला सोडवता आलेल्या नाहीत, अशा व्यक्तीने खासदारांसारख्या व्यक्तीमत्वावर टिका करणे अशोभनीय आहे. कासचे श्रेय घेण्याकरीता इतकी टिमकी वाजवत असाल तर तुमच्या नेत्यांनी कास बंदिस्त पाईपलाईन 1978 ते 1998 पर्यंत का केली नाही? 1 कण्हेर उद्भव योजना जी ग्रव्हीटी पध्दतीची होती आणि जीचे भुमिपूजनही झाले होते, ती सोडून कुणाच्या लाभासाठी दोन दोन ठिकाणी लिफिटंग-पंपिंग करावी लागणारी शहापूर योजना माथी मारली. सातारकरांवर इतके प्रेम होते तर कास धरणाची उंची वाढवण्यासाठी तुम्ही प्रस्ताव देवून प्रयत्न केले नाही, याची आधी उत्तरे द्या आणि मग कुणाचे श्रेय आहे समजले तर ते सांगा, अशी सणसणीत चपराक नगराध्यक्षा माधवी संजोग कदम यांनी अशोक मोने यांना लगावली आहे.

ज्या व्यक्तीला स्वतःच्या वॉर्डात चांगली कामे करता आली नाहीत,  अशी अशोक मोने नामक व्यक्ती आज खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टिका करत असेल तर अशा व्यक्तीला भयंकर गर्व झाला असावा किंवा आपली उंची व प्रकृती खुपच आहे असे वाटत असावे. असे शाब्दिक फटकारतानाच, माधवी कदम यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात,

..तर याला दुर्दैव म्हणावे लागेल

खासदार उदयनराजेंनी कास धरणाची उंची वाढवण्याचा परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर केला, त्याकामाची मंजूरी मिळवण्यासाठी जरुर तो पाठपुरावा करुन, केंद्र शासनाच्या आखत्यारितील पर्यावरण, वन, पुरातत्व खाते आदींची मंजूरी, संसद सदस्य असल्यानमुळे तातडीने मिळवून घेतल्या. तुमच्या निधीच्या बैठकीच्या वेळी नगरपरिषदेत मनोमिलन होते, खासदार आणि तत्कालिन मंत्री यांचे सख्य सर्वश्रुत असल्याने, तुमचे नेतेच, तुम्ही येवू नका असं अत्यंत आर्जवीने म्हणाले होते. म्हणूनच खासदार उदयनराजे हे त्या बैठकीत अनुपस्थित राहीले. तुम्हीच उपस्थित राहु नका असे आदबीने सुचवून, आता तुम्हीच बैठकीस उपस्थित का नव्हता, असे प्रोसिडींगचा दाखला देवून कासचे श्रेय उदयनराजेंचे नाही, असा गळा काढत असाल तर याला दुर्दैव म्हणावे लागेल. प्रस्ताव दिला, त्यानुसार मंजु-या मिळाल्या, आता काम मार्गी लागत आहे, त्यामुळे याचे श्रेय उदयनराजेंकडेच जाते, हे सत्य आहे. सत्य नेहमीच कटु असते, म्हणूनच तुम्हाला ते पचनी पडत नाही. मंत्री म्हणून लोकोपयोगी कार्याला निधी दिलेल्या मंत्री महोदय यांनी, त्यांचे कर्तव्य केले. त्याला  तुम्ही उपकार मानता, परंतु प्रस्ताव देवून, केंद्राच्या विविध मंजूऱया घेणाऱया उदयनराजेंचे कर्तृत्व नाकारता यावरुन तुम्ही परधार्जिणे आहातच; पण तुमच्या पोटात उदयनराजें विषयी किती विष भरले आहे, हे जनतेला समजून चुकले आहे. 

बोलके उदाहरण तुमच्यासाठी पुरेसे आहे

मोने यांनी नगराध्यक्षपदाच्या काळात, झोपडपट्टीधारकांच्या घरांवर अतिक्रमणाचा बुलडोझर फिरवून हजारो झोपडपट्टीवासीयांना बेघर केले होते. नगराध्यक्षपदाच्या काळातीलच हे एक फार मोठे काम तुम्ही करुन दाखवले आहे. याउलट उदयनराजेंनी माणुसकीच्या भावनेतून, प्रसंगी कायद्याची चौकट मोठी करुन, झोपडपट्टीधारकांसाठी घरकुल योजना मंजूर करुन, त्यांना फार मोठा दिलासा झोपडपट्टीवासीयांना दिला आहे, हे एकच बोलके उदाहरण तुमच्यासाठी पुरेसे आहे, असेही कदम यांनी ठणकावले आहे. 

तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील आणि उदयनराजेंच्या शुभहस्ते भुमीपूजन झालेली कण्हेर योजना डावलून,  शहापूर योजना तुम्ही लादली. लादलेली योजना लगेचच बंद करता येते का? हे तुम्हाला समजेल, अशा शब्दात मोने यांची नगराध्यक्षांनी खिल्ली उडवली.