|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा डेअरीवर माधव सहकारी पॅनल

गोवा डेअरीवर माधव सहकारी पॅनल 

प्रतिनिधी/ फोंडा

गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादक संघाच्या (गोवा डेअरी) संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत माधव सहकारी यांच्या गोवा डेअरी उत्कर्ष पॅनलने बाजी मारली. या पॅनलमधील 12 पैकी 11 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या गोवा डेअरी बचाव पॅनलमधील 12 पैकी एकमेव उमेदवार निवडून आला. गोवा राज्य सहकार लवादाच्या आदेशानुसार ही फेरनिवडणूक घेण्यात आली होती.

गोव्यातील 4 केंद्रांवर रविवार 7 रोजी ही निवडणूक घेण्यात आली. काल सोमवारी कुर्टी फोंडा येथील सहकार भवनमध्ये मतमोजणी झाली. त्यात गोवा डेअरी उत्कर्ष पॅनलचे माधव सहकारी, अजय देसाई, धनंजय देसाई, विठोबा देसाई, बाबुराव फट्टो देसाई, बाबू कोमरपंत, नरेश मळीक, गुरुदास परब, विजयकुमार पाटील, राजेश फळदेसाई व राजेंद्र सावळ हे 11 उमेदवार विजयी झाले.

विरोधी गटाचा एकमेव उमेदवार विजयी

गोवा डेअरी बचाव पॅनलमधील असेल्मो फुर्तादो हा 12 पैकी एकमेव उमेदवार विजयी झाला. सहकारी पॅनलमधील उल्हास सिनारी यांचा अवघ्या दोन मतांनी त्यांनी पराभव केला. माधव सहकारी यांना 165 पैकी सर्वाधिक 117 मते मिळाली. गोवा डेअरी बचाव पॅनलमधून विजयकांत गावकर, वैभव परब, प्रमोद सिद्धये, विनायक पिळर्णकर, नितीन प्रभूगावकर, म्हाळगो गावकर, दुर्गेश शिरोडकर, फोंडू गावकर, विश्वास सुखठणकर, लाला सतरकर, दत्ताराम सावंत व असेल्मो फुर्तादो यांनी निवडणूक लढविली. राज्यातील 165 स्थानिक दूध सोसायटींच्या प्रतिनिधीने मतदान केले. डिचोली व सत्तरी विभाग, तिसवाडी, बार्देश व पेडणे विभाग, फोंडा, सालसेत व धारबांदोडा विभाग आणि केपे, सांगे व काणकोण विभाग अशा चार केंद्रात मतदान झाले.

जानेवारीत झाली होती वादग्रस्त निवडणूक

गेल्या जानेवारी महिन्यात गोवा डेअरीची निवडणूक होणार होती. मात्र निवडणूक प्रक्रियेच्या काळात 41 पैकी 27 उमेदवार विविध तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरल्याने केवळ 15 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी तिघा उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. अपात्र ठरलेल्या 27 पैकी 12 उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर या बाराजणांना निवडणूक लढविण्याची संधी देण्यात यावी, असा निकाल गोवा राज्य सहकार लवादाने दिला होता. त्यानुसार 7 मे रोजी ही निवडणूक घेण्यात आली. निर्वाचन अधिकारी म्हणून सतीश सावंत यांनी काम पाहिले.

आपल्या पॅनलच्या विजयामध्ये राज्यातील दूध उत्पादकांचा मोठा वाटा आहे. गोवा डेअरीच्या कारभारात सुधारणा करतानाच दूध उत्पादक व ग्राहक हिताचे निर्णय घेतले जाईल, असे माधव सहकारी यांनी यावेळी बोलताना सांगितले. दुधाच्या दर्जाकडे गांभीर्याने लक्ष घालतानाच येत्या दोन वर्षांत 1 लाख लिटर दूध उत्पादनाचे लक्ष्य गाठण्याचा आपल्या मंडळाचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.