|Saturday, July 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पर्यटकांनी कोकण फुलले

पर्यटकांनी कोकण फुलले 

सुट्टय़ा पडल्यानंतर चाकरमानी मोठय़ा प्रमाणात कोकणात येऊ लागले आहेत़ वर्षानुवर्ष मे महिन्याच्या सुट्टीत गावी जाऊन धुमाकूळ करूया म्हणणाऱया शाळकरी मुलांना घेऊन पालक आपल्या मूळ गावी येत आहेत़ या येण्यामुळे आपल्या गावची नव्या पिढीची नाळ घट्ट होत जाते याचे समाधान पालकांना मिळत आह़े सध्या कोकणात खूप मोठय़ा प्रमाणात चाकरमानी आले आहेत़ त्यांच्यासोबत राज्यातील इतर भागातल्या पर्यटकांनीदेखील गर्दी केली आह़े

रत्नागिरी जिह्यातील दापोली तालुक्यात मुरूड, आंजर्ले, हर्णे, दाभोळ, दापोली अशा अनेक गावांमध्ये पर्यटकांची मोठी संख्या दिसून येत आह़े गुहागर तालुक्यात हेदवी, वेळणेश्वरच नव्हे तर अन्य गावांमध्ये देखील मोठय़ा प्रमाणात पर्यटक येऊन थडकले आहेत़ रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस आल्याचे तेथील व्यवसायिकांचे म्हणणे आह़े राजापूर तालुक्यातील नाटेसह अनेक खेडय़ांमध्ये पर्यटक येत आहेत़ पूर्णगड, यशवंतगड, सिंधुदुर्ग, रत्नदुर्ग, विजयदुर्ग अशा अनेक सागरी किल्ल्यांच्या पर्यटनाच्यासोबत भगवानगड त्याचबरोबर पन्हाळेकाजी येथील लेण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आह़े हरीहरेश्वर, कर्णेश्वर, कुणकेश्वर, मार्लेश्वर अशा धार्मिक ठिकाणी पर्यटक पोहोचत आहेत़ पावसला धार्मिक मंडळी आवर्जून भेट देत आहेत़ मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी अशा तालुक्यांमध्ये पर्यटकांवी संख्या खूप मोठी दिसून येत आह़े देवगड, समुद्रकिनारी पर्यटक लक्षणीय संख्येत आहेत़ रायगड जिह्यातही पर्यटकांनी समुद्रकिनारे फुलले असल्याचे दिसून येत आह़े अनेक ठिकाणी या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आह़े पोलीस खात्याच्या वाहतूक शाखेला त्याकडे विशेष लक्ष पुरवावे लागत आह़े शाळांचा एप्रिलच्या मध्यास अभ्यासक्रम शिकवून परीक्षा झाल्य़ा त्यानंतर पर्यटक संख्येत हळूहळू वाढ झाल़ी

गतवर्षी म्हणजे 2016 च्या मे महिन्यात चिपळूण येथे राज्यसरकारच्या पुढाकाराने पर्यटन महोत्सव पार पडल़ा त्या महोत्सवात अनेक घोषणा झाल्य़ा  चिपळुणातील महोत्सवात कोकणातील पर्यटन वाढावे यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र वायकर, पर्यटन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केल्य़ा पालकमंत्री वायकर यांनी जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी 670 कोटीचा आराखडा तयार असल्याचे सांगितल़े या निधीची केंद्रीय मंत्री गीते यांनी त्यासाठी जबाबदारी घेतली होत़ी. पर्यटन वाढवायचे असेल तर केवळ तेथील पर्यटन स्थळांचा विकास पुरेसा नाही. त्यासाठी त्या स्थळापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते आवश्यक असतात. त्यामुळेच या रस्त्याचे महत्व ओळखून गीते यांनी पर्यटनात्मक रस्ते यापुढे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून घेतले जातील अशी घोषणा केल़ी परंतु वर्षभरात रत्नागिरी जिह्याच्या काय़ परंतु चिपळूण तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी भरीव असे काही झाले हे म्हणणे धाडसाचे ठरेल़

कोयनेचे वाया जाणारे पाणी हा नेहमी चर्चेला विषय राहिला आहे. वाया जाणाऱया या पाण्याचा काहीतरी उपयोग करावा हे स्थानिक राजकारण्यांना कधी उमगलेलेच नाही, पण पालकमंत्री वायकर यांनी वाशिष्ठी नदीत केरळच्या धर्तीवर शिकारा बोटींग आणि श्रीक्षेत्र परशुराम ते गोवळकोट किल्ल्यादरम्यान रोप वेचा निर्णय घेतला खऱा परंतु चिपळूण पर्यटन महोत्सवातील या घोषणेनंतर काहीही झालेले नाह़ी सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण येथे महाविद्यालयीन विद्यार्थी बुडून मृत्यूमुखी पडले त्यापूर्वी रायगड जिह्यात देखील महाद्यालयीन विद्यार्थ्यांवर असाच प्रसंग गुदरला होत़ा अधुनमधून गणपतीपुळे येथे पर्यटक बुडून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना होत असतात़ यावर दखल म्हणून जिल्हा प्रशासनाने सुरक्षित पर्यटन क्षेत्र किनारे विकसीत करण्याचा निर्णय घेतला आह़े जीवरक्षक लोक कायम उपस्थित राहतील, अशी सतरा ठिकाणे रत्ना†िगरी जिह्यात निश्चित करण्यात आली आहेत़ कोकणाबाहेरील लोकांचे समुद्रप्रेम विशेष आह़े समुद्राच्या संदर्भात फारशी माहिती नसताना पोहायला जाण्याचे धाडस अनेकजण करत असतात़ ते त्यांच्या अंगलट येत़े त्यामुळे अनेकजण बुडून मृत्यूमुखी पडतात़ अद्यापही कोकणात सुरक्षितपणे पोहोण्यासाठी किनारा उपलब्ध झाला नसला तरी नजीकच्या काळात तो उपलब्ध होईल, अशी शक्यता निर्माण झाली आह़े

सध्यस्थितीत पर्यटनाला विकासाचे भागीदार होण्यासाठी स्थानिक स्तरावरून नवनवे उपक्रम राबवले जात आहेत. धार्मिक स्थळे, कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटनाबरोबरच आता जिल्ह्यातील खाडय़ा, मोठय़ा नद्यांमध्ये फेरीबोट, वॉटरस्पोर्टस्चे नवे पर्याय उभे रहात आहेत. त्यामुळे पर्यटन आता व्यवसाय म्हणून कोकणात यशस्वी होऊ शकेल, अशी अनेक उद्योजकांना खात्री वाटू लागली आह़े मनुष्यबळाचा पर्यटन हेतूसाठी विकास व्हावा, असे सरकारी धोरण असल तरी प्रत्यक्षात त्या दृष्टीने पावले पडत नाहीत़ त्यामुळे पर्यटनातून बेकारी दूर होण्यासाठी योग्य दिशेची पावले आहेत़, असे म्हणणे कठीण आह़े पारंपारिक ज्ञान व कौशल्याच्या आधारावर पर्यटक सेवा होत आह़े तथापी पर्यटन हा मुख्य हेतू ठेवून मनुष्यबळाचा विकास करण्याची विशेष योजना दिसत नाह़ी राजकीय नेत्यांच्या सभा बैठकांमध्ये लंबी चौडी भाषणे होतात़ परंतु कार्यवाहीच्या दिशेने अजिबात काही होत नाह़ी

पर्यटकांना कोकणात आणण्यासाठी कोकण रेल्वे, मध्यरेल्वे यांनी यावर्षी विशेष योजना राबवल्या आहेत़ पनवेलपासून रोह्यापर्यंतचा रेल्वेमार्ग दुपदरी झाल्याने वेळापत्रक सांभाळण्यासाठी रेल्वेला दिलासा †िमळाला आह़े कोकण क्षेत्रातील अडीअडचणी प्राधान्याने दूर करण्याविषयी केंद्रीय रेल्वमेंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बोर्डाला सूचना दिल्या असल्यामुळे कोकण रेल्वेचे प्रश्न अधिक झटपट दूर होत आहेत़ गतवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील कोकण व मध्यरेल्वेला सुट्टीतील जास्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने अधिक गाडय़ा उपलब्ध करून दिल्या आहेत़ यामुळे कोकण, गोवा भागातील लोकांची विशेष सोय झाली आह़े एसटी महामंडळ आपल्या मर्यादित साधनसामुग्रीनीशी मुंबईतून कोकणात जाणाऱया चाकरमानी व पर्यटकांना विशेष सोय देत आहेत़ जादा गाडय़ा सोडून प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यात येत आह़े अधिक साधनसामुग्रीची मागणी एसटीचे अधिकारी आपल्या वरिष्ठय़ांकडे करत आहेत़