|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आपकडून दिल्ली विधानसभेत ईव्हीएम फेरफार प्रात्यक्षिक

आपकडून दिल्ली विधानसभेत ईव्हीएम फेरफार प्रात्यक्षिक 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मतदान मशीनमध्ये (ईव्हीएम) फेरफार केला जाऊ शकतो, असा दावा करत त्याची प्रात्याक्षिकच आम आदमी पक्षाने मंगळवारी दिल्ली विधानसभेत सादर केले.  ईव्हीएममधील गैरप्रकार हा अत्यंत सोपा असल्याचा दावा आमदार सौरभ भारव्दाज यांनी केला. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळला आहे. आपने दाखवलेली प्रात्यक्षिकाचे मशीनच बनावट असल्याचेही स्पष्ट करत 12 मे रोजी सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी मतदान मशीन ‘हॅक’ करून दाखवावे, असे आव्हान आयोगाने दिले आहे.

 नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर ईव्हीएममधील फेरफार झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत होता. आपने यासंदर्भात मंगळवारी विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवले होते. आमदार सौरभ भारव्दाज ईव्हीएमसारखी मशीन घेऊन सभागृहात आले. त्यांनी ईव्हीएम हॅक करून मतदान एकच पक्षाला कसे होऊ शकते, याचे प्रात्यक्षिक दाखवले. पक्षाचे कार्यकर्ते गुप्त क्रमांक टाकून ईव्हीएम हॅक करू शकतात. केवळ 90 सेंकदामध्ये मशीनचा मदरबोर्ड बदला येऊ शकतो. सकाळी सात ते नऊ या कालावधीत मतदानाची योग्य नोंद होते. मात्र मशीन हॅक करून गुप्त क्रमांक टाकणाऱया पक्षालाच पुढील सर्व मते मिळतात, असा दावा त्यांनी केला. भिंड मतदारसंघात असाच फेरफार झाला आहे. त्यामुळे सर्व मतदान भाजपलाच  झाल्याचा आरोप त्यांनी केला.   या मुद्यावर मुख्य़मंत्री केजरीवाल यांच्या अन्य सदस्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

 निवडणूक आयोगाने दावा फेटाळला, आपला दिले आव्हान

आपच्या सर्व आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत.  ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकत नाही. मतदानापूर्वी निवडणूक उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोरच मशीन दोनवेळा तपासले जाते. मतदानानंतरही त्यांच्यासमोरच ती  सील करून सुरक्षित ठिकाणी पाठवले जाते, असे आयोगाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
याप्रश्नी  12 मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. यावेळी निवडणूक आयोगाचे मतदान मशीन हॅक करून दाखवावे,  असे खुले आव्हानही आयोगाने आपला दिले आहे. दरम्यान माजी निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनीही आपच्या प्रात्यक्षिकांवर आक्षेप घेतला आहे. आपने विधानसभेत आणलेले मशीन कोणते होते. त्याची पारदर्शकता कशी तपासणार, असे सवाल त्यांनी केले. तसेच ईव्हीएमची निर्मिती दोन महत्त्वाच्या सार्वजिक क्षेत्रातील कंपन्यांकडून केली जाते. त्यामुळे मशीन हॅक करणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.