|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आटपाडी तालुक्यात रविवारी महाश्रमदान

आटपाडी तालुक्यात रविवारी महाश्रमदान 

प्रतिनिधी/ आटपाडी

सत्यमेव जयते पाणी फौंडेशन वॉटर कपच्या निमित्ताने आटपाडी तालुक्यात रविवार दि.14 मे रोजी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात होणाऱया महाश्रमदानाच्या निमित्ताने सुमारे 10 हजार लोकांनी एकाचवेळी मोहिमेत सहभागी व्हावे, यासाठी नियोजन सुरू असून पुन्हा एकदा तालुक्यात श्रमदान चळवळीचे तुफान येणार आहे.

आटपाडी तालुक्यात सध्या वॉटर कपची धामधुम सुरू झाली आहे. तालुक्यातील शेरेवाडी, कानकात्रेवाडी, पळसखेल, धावडवाडी, कौठुळी, बोंबेवाडीसह अन्य गावात श्रमदानाने मोठी चळवळ उभारली आहे. या चळवळीने आत्ता विस्तृत स्वरूप मिळविले असून स्पर्धेचा कालावधी कमी होवु लागल्याने त्याला आणखी गती देण्याचे नियोजन सुरू आहे. तालुक्यात 1 मे रोजी महाश्रमदानाने मोठी चळवळ निर्माण केली होती. त्यावेळी कानकात्रेवाडी व शेरेवाडी येथे एकत्रीत दोन हजाराच्या घरात लोकांनी श्रमदान केले.

आता पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात 14 मे रोजी महाश्रमदान शिबीर होणार आहे. हे महाश्रमदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषि विभागाने भरीव योगदान देण्याबाबत नियोजन सुरू आहे. सभापती हर्षवर्धन देशमुख, बीडीओ मिना साळुंखे यांनी पुणे, मुंबईसह विविध शहरी भागात कार्यरत संस्था, उद्योग समुहांना पत्र पाठवुन या श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सध्या गावनिहाय बैठकांना वेग देवुन तालुका समन्वयक संदीप सावत, सत्यवान देशमुख व अन्य सहकारी लोकसहभाग वाढविण्यासाठी मार्गदर्शन करताहेत. तालुक्यातील सुमारे 17 गावातील सर्व लोकांनी, नातेवाईकांना निमंत्रीत करून सर्वांनी श्रमदान करावे, असे नियोजन होत आहे. तालुक्यातील विविध संघटना, संस्था, शाळा-कॉलेज, राज्य सरकारचे कर्मचारी, पोलीस, विद्यार्थ्यांनी या श्रमदानात सहभागी व्हावे आणि तालुका वॉटर कपच्या निमित्ताने पाणीदार करत श्रमाला महत्त्व प्राप्त करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज सई ताम्हणकर

वॉटर कपला बळकटी देत श्रमदान करणाऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी आज बुधवारी सिने अभिनेत्री सई ताम्हणकर आटपाडी तालुक्यात येणार आहे. साई ताम्हणकर यांच्यासह त्यांच्या मातोश्री, पाणी फौंडेशनचे डॉ.अविनाश पोळ व अन्य मान्यवर आटपाडी तालुक्यातील वॉटर कपच्या माध्यमातुन सुरू असणाऱया कामाची पाहणी करून स्वत: श्रमदान करणार आहेत.

Related posts: