|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रत्येक गावात मराठी संस्कार केंद्र उभे व्हावे

प्रत्येक गावात मराठी संस्कार केंद्र उभे व्हावे 

वार्ताहर/ काकोडा

गोव्यात मराठी भाषा रूजविण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक गावात मराठी संस्कार केंद्र उभे व्हावे, असे उद्गार गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी काढले. बालवयात जडणघडण झाली पहिजे, कोवळय़ा वयात मुले बिघडता कामा नये. त्यांना घडविण्याचे कार्य मराठी संस्कार केंद्रांतून व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जानोडे – मळकर्णे येथील श्री पाईकदेव देवस्थानच्या जीर्णोद्धार व पुनःप्रतिष्ठापना महोत्सवाचे औचित्य साधून नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या गोवा मराठी अकादमी संचालित मळकर्णे सांस्कृतिक केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मडगावातील गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर, मळकर्णे सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष श्रीपाद सामंत, सचिव चंद्रकांत गावकर, गोवा मराठी अकादमीचे केपे तालुका अध्यक्ष दीपक देसाई, देवस्थानचे अध्यक्ष भिकाजी वालावलकर, रमेश दाभोलकर उपस्थित होते.

सध्या प्रत्येक घरात पैशांच्या श्रीमंतीपेक्षा चांगल्या विचारांची श्रीमंती वाढविण्याची गरज आहे. तरच आजची पिढी समाजासाठी काही तरी करण्याकरिता पुढे येईल, असे पुढे बोलताना प्राचार्य सामंत म्हणाले. स्थानिक युवा पिढीवर प्रत्येक गावातील संस्कार केंद्रातून संस्कार होण्याची गरज आहे. त्यांच्यातील कलागुणांची पारख करून त्यांना चकाकी देतानाच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य या केंद्रांतून घडावे, अशी अपेक्षा वेर्लेकर यांनी व्यक्त केली.

श्रीपाद सामंत यांनी केंद्राच्या स्थापनेमागचा उद्देश स्पष्ट करताना गावातील मुलांना संस्कारमय करण्याचा तसेच विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. रमेश दाभोलकर यांनी स्वागत, तर भक्ती दाभोलकर हिने सूत्रसंचालन केले. चंद्रकांत गावकर यांनी आभार मानले. यावेळी संगीत शिक्षक राजेश मडगावकर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी गायन सादर केले.