|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना जारी

पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना जारी 

प्रतिनिधी/ पणजी

ग्राम पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचनेची अधिसूचना काल मंगळवारी जारी करण्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी (एससी) राखीवता देण्यात आलेले 9 वॉर्ड वाढून ते 15 होण्याची शक्यता असून एकंदरीत राखीवतेसंदर्भात अधिसूचना येत्या दोन दिवसात जारी होण्याची शक्यता आहे. त्यासदंर्भातील फाईल पंचायत खात्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठविली आहे.

प्रभाग पुनर्रचनेमुळे 16 पंचायतींमध्ये मिळून 32 नव्या प्रभागांची निर्मिती झाली आहे. त्याचबरोबर यावर्षी केळशी ही नवी पंचायत स्थापन करण्यात आल्याने तिचे 7 प्रभाग आहेत. त्यामुळे राज्यातील 186 पंचायतींचे मिळून एकूण प्रभाग 1522 झालेले आहेत.

पंचायत खात्याच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एससी लोकसंख्येची राखीव वॉर्डकरीता लागणारी मर्यादा आणखी कमी करण्यास संमती दिल्यामुळे एससीचे राखीव वॉर्ड आणखी वाढतील हे आता स्पष्ट झाले आहे, परंतु ते किती आणि कुठे वाढतील हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

पंचायत निवडणुकीचा एकंदरीत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग आता लवकरच जाहीर करणार आहे. साधारणपणे 15 मे पासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.