|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » ऐजवाल एफसी उपांत्य फेरीत

ऐजवाल एफसी उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ कटक

आय लीग चॅम्पियन्स ऐजवाल एफसीने गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघावर 2-1 असा विजय मिळवित फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

गट अ मधील या सामन्यात 21 व्या मिनिटाला लालराम चुलोवाने पेनल्टी स्पॉटवर ऐजवालला आघाडीवर नेले होते. पण 84 व्या मिनिटाला घानेफा क्रोमाहने पेनल्टीवर गोल नोंदवून चर्चिल ब्रदर्सला बरोबरी साधून दिली होती. 89 व्या मिनिटाला लालदनमाविया राल्तेने हेडरवर ऐजवालचा दुसरा व निर्णायक गोल नोंदवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.

दोन्ही संघांनी संथ सुरुवात करीत सावध खेळावर भर दिला होता. पहिल्या पंधरा मिनिटात फक्त एकदाच कामोने गोलच्या दिशेने फटका मारला. 21 व्या मिनिटाला मात्र ऐजवालला पेनल्टी मिळाल्यावर सामन्याला खरी रंगत मिळाली. ऐजवालच्या लालरुआथ्राला आदिल खानने बॉक्स क्षेत्रात पाडविल्यामुळे ही पेनल्टी मिळाली होती. त्यावर चुलोवाने गोलपोस्टच्या उजव्या कोपऱयात चेंडू फटकावत ऐजवालला आघाडी मिळवून दिली. यानंतर चर्चिलनेही आक्रमण तेज केले आणि पुढच्याच मिनिटाला त्यांना एक संधी मिळाली होती. पण ब्रँडन फर्नांडीसचा फटका अल्बिनो गोम्सने दूर सारत ही संधी वाया घालवली. मेहमूद अल अमना, जयेश राणे, बायी कामो आघाडीवरील त्रिकुटाने चर्चिलच्या बचावफळीला वारंवार दडपणाखाली ठेवले होते.

उत्तरार्धातील अंतिम सत्रात चर्चिलने थोडेफार वर्चस्व मिळविले होते. पण त्यांना लाभ घेता आला नाही. ऐजवालने सावध पवित्र्यावर भर देत चर्चिलला बरोबरीची संधी मिळणार नाही, याची दक्षता घेतली. 72 व्या मिनिटाला क्रोमाहने दीर्घ पासवर ताबा घेत जोरदार फटका मारला. पण ऐजवालच्या बचावफळीने त्याला यश मिळू दिले नाही. 84 व्या मिनिटाला चर्चिलला पेनल्टी मिळाली आणि त्यावर क्रोमाहने अचूक गोल नोंदवून बरोबरी साधून दिली. मात्र 89 व्या मिनिटाला राल्तेने गोल नोंदवून चर्चिल ब्रदर्सचा पराभव निश्चित करीत पूर्ण तीन गुण वसूल केले.