|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवगडला मोबाईल शॉपी आगीत खाक

देवगडला मोबाईल शॉपी आगीत खाक 

देवगड : येथील अनुसया कॉम्प्लेक्समधील संदीप श्यामराव यादव (रा. जामसंडे श्रीकृष्णनगर) यांच्या मालकीच्या मंत्रा मोबाईल शॉपीला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागून मोबाईल शॉपी पूर्णतः खाक झाली. यामध्ये शॉपीचे सुमारे नऊ लाखाचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे दोन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

अधिक माहिती अशी, संदीप यादव हे बुधवारी नेहमीप्रमाणे रात्री 8 वाजता शॉपी बंद करून घरी गेले. मध्यरात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास कॉम्प्लेक्सनजीकच्या रस्त्यावरून जाणारे देवगड येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार उर्फ पी. टी. पेडणेकर यांना शॉपीच्या शटरमधून मोठय़ा प्रमाणात धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने देवगड पोलीस स्थानकाला कल्पना दिली. तसेच त्यांनी मालक संदीप यादव यांनाही कळविले. सुरुवातीला पेडणेकर यांनी मांजरेकर यांच्या घराकडून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दुकानातील फर्निचरमुळे आग अधिक भडकत असल्याने अखेर टेम्पोने पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

आग विझविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले

देवगड पोलीस उपनिरीक्षक डी. एस. वाळवेकर, नितीन शेटये, मिलिंद परब, गुरुनाथ परब, दादा परब, सुरेश पाटील यांच्यासह शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे सुधीर मांजरेकर, सुनील कुळकर्णी, नंदकुमार कुळकर्णी, उत्तम पोकळे, संजय धुरी, पप्पू जगताप, प्रशांत पोकळे, वीरेंद्र कार्लेकर, जयराम राऊळ आदींनी घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या दुकानाच्या बाजूलाच असलेल्या दुकानांमध्ये फटाके ठेवण्यात आले होते. आग पसरत गेली असती तर मोठा अनर्थ झाला असता.

पेडणेकरांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

पेडणेकर यांनी वेळीच तत्परता दाखविल्यामुळे हा मोठा अनर्थ टळला. अन्यथा कॉम्प्लेक्समधील सर्वच गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते. आगीची माहिती मिळाल्यानंतर वीज वितरणचे कर्मचारी राऊत यांनी घटनास्थळी येत कॉम्प्लेक्सचा वीजपुरवठा खंडित केला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असली, तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

या आगीमध्ये मंत्रा मोबाईल शॉपीमधील मोबाईल, मोबाईलची मशिनरी, साहित्य, मोबाईल बॅटरी व फर्निचर असे साहित्य जळून खाक झाले. सुमारे नऊ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती यादव यांनी पोलिसांत दिली आहे.