|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीशिवाय दुसरा विचारच केला नाही

पणजीशिवाय दुसरा विचारच केला नाही 

प्रतिनिधी /पणजी :

पोटनिवडणूक लढविण्यासाठी आपण पणजी मतदारसंघाव्यतिरिक्त दुसरा विचारंच केला नाही. पणजी हा माझा मतदारसंघ आहे आणि सिद्धार्थ कुंकळकर यानीही सुरुवातीपासूनच तयारी दर्शविली होती, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पणजी मतदारसंघातील कार्यकर्ते तसेच सिद्धार्थ कुंकळकर यांचे त्यांनी आभार मानले. त्याचबरोबर कुडचडेतील आमदार नीलेश काब्राल व कार्यकर्त्यांचेही आपण मनापासून आभार मानत असल्याचे ते म्हणाले.

कुडचडे मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविण्याचा प्रस्ताव काब्राल यांनी ठेवला होता. मात्र आपण पणजी मतदारसंघाशिवाय अन्य मतदारसंघांचा कधी विचारच केला नाही. त्याचबरोबर पणजीतील कार्यकर्ते व आमदार यांनी एकमताने हा निर्णय घेतला. पणजी मतदारसंघाचा आपण विश्वस्त असल्याचे सिद्धार्थ कुंकळकर हे स्वतः सांगायचे तसेच पणजी मतदारसंघातील जनतेशी आपण सतत संपर्कात असतो, त्यामुळे पणजी मतदारसंघाचाच मी विचार केला होता, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सिद्धार्थ कुंकळकर यांनी आमदार म्हणून पणजी मतदारसंघाचा बराच विकास केला. अमृत व स्मार्ट सिटी प्रकल्पही पणजीत येत आहेत. आपल्या कारकीर्दीतही पणजीचा बराच विकास झाला. पणजी बरोबरच कुडचडे मतदारसंघाचा आणि एकूणच गोव्याचा विकास साधला जाणार आहे.

निवडणुकीबाबत आपण फार गंभीर

आपल्या विरोधात उमेदवार कोण असेल व तो कसा असेल यावर आपण कोणतेही भाष्य करणार नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. आपण निवडणुकीबाबत गंभीर असल्याचेही ते म्हणाले. साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पोटनिवडणूक होणार असल्याचे ते म्हणाले. पुढील पाच वर्षे आपण गोव्यातच असेन असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.