|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा मांस प्रकल्पातील कामगार पगाराच्या प्रतिक्षेत

गोवा मांस प्रकल्पातील कामगार पगाराच्या प्रतिक्षेत 

वार्ताहर /उसगांव :

म्हारवासडा उसगांव येथील गोवा मांस प्रकल्पात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱया 48 कामगारांना मागील पाच महिन्यांचा पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या जून महिन्यापासून शाळा सुरु होणार आहे. मात्र या कामगारांना आपल्या मुलांसाठी गणवेश, वह्य़ा व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणायचे ही चिंता सतावू लागली आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कामगारांच्या या समस्येकडे त्वरित लक्ष घालून त्यांचा पाच महिन्यांचा थकलेला पगार लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे. दरम्यान, लिंडन मोंतेरो यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले असून कामगारांच्या समस्येकडे लक्ष कुणी घालायचे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. वास्तविक याठिकाणी अधिक कामगारांची आवश्यकता असूनही 48 कामगार दिवसा व रात्रपाळीत काम करतात. सेवेत कायम करण्याची किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची कामगारांची मागणी नसून महिन्याचा पगार वेळेत दिला जावा या एकमेव मागणीसाठी कामगार धडपड करीत आहे. भाजपा सरकार सत्तेवर असताना या कामगारांना कंत्राटी पद्धतीवर कामावर घेतले होते. दर सहा महिन्यांनी नव्याने करार करून या कामगारांचे कंत्राट कायम केले जाते. मागील दीड वर्षांपासून हे 48 कामगार मांस प्रकल्पात काम करीत आहेत. गेल्या पाच महिन्यापासून पगारातील एक पैसाही हाती न आल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला आहे. याठिकाणी भविष्याची शाश्वती नसल्याने चार कामगार काम सोडून इतर ठिकाणी कामावर रुजू झाले आहेत. पाच महिने थकलेला पगार लवकरात लवकर मिळावा व प्रकल्पावर अध्यक्षांची नेमणूक करावी अशी मागणी कामगारांनी सरकारकडे केली आहे.