|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा विपर्यास

रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा विपर्यास 

कुडाळ : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा विपर्यास करून शिवसेना व काँग्रेसची मंडळी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारण करणाऱयांचा भाजपच्यावतीने निषेध करण्यात येत आहे, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 2019 च्या निवडणुकीत आपले काही खरे नाही, या भडतीपोटीच दानवे यांची बदनामी सुरू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

येथील एमआयडीसी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दानवे गेली 35 वर्षे निवडून येतात व ते शेतकरी कुटुंबातील आहेत. शेतकऱयांबाबत कसे बोलावे, हे त्यांना सांगण्याची गरज नाही, असे सांगून कार्यकर्त्यांमधील संवाद बाहेर आणून काहींनी राजकारण सुरू केले आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जि. प., नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांत भरघोस यश मिळविले. विरोधकांची लढाई आता अस्तित्वासाठी चालली असून कधी नोटाबंदी, दुष्काळ, शेतकऱयांच्या
प्रश्नांचे राजकारण केले जात आहे. जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन सेना-काँग्रेस भाजप नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे तेली म्हणाले.

                     मग पालकमंत्र्यांचा निषेध कसा करावा?

भाजप पदाधिकाऱयांनी बांगडय़ा भरलेल्या नाहीत. मात्र, शांतताप्रिय जिल्हय़ात विचार व विकासाची आम्हाला जपणूक करायची आहे, असे ते म्हणाले. बांदा भागात वादळ झाले. पालकमंत्री जिल्हय़ात असताना तिथे फिरकले नाहीत. सावंतवाडीत फादरांच्या सांगण्यावरून मृतदेह दफन करण्यास देऊन हिंदू-ख्रिश्चन समाजात दुही निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. त्यावेळी शिवसेना कुठे गेली होती? आरोग्यमंत्री दीपक सावंत असताना माकडतापाचे अकरा बळी गेले. आरोग्य यंत्रणा कोलमडली. या सर्व घटनांसह पालकमंत्री व आरोग्यमंत्र्यांचा निषेध कसा करायचा, असा सवाल त्यांनी केला.

     किल्ल्यावरून वाद नकोत!

मुंबई-गोवा महामार्ग, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण यासह अन्य कामे भाजपच्या माध्यमातून सुरू असल्याचे ते म्हणाले. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवासी व प्रेरणोत्सव समिती यांच्यामध्ये समन्वय साधण्याची गरज आहे. प्रेरणोत्सव समितीने किल्ला संवर्धनासाठी चांगले काम केले आहे. सिंधुदुर्ग किल्ला ही आपली अस्मिता आहे. त्यामुळे वाद न करता एकत्र येऊन प्रश्न सोडवावेत. भाजप सरकारने किल्ला संवर्धनासाठी लक्ष घातल्याचे ते म्हणाले.