|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भाचरवाडी खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा

भाचरवाडी खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा 

सुर्यदीप पाटील याचा गोळी घालून खून

प्रतिनिधी/ कोल्हापूर

पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी येथे कौटुंबिक वादातून तीन वर्षांपुर्वी पोपट श्रीपती गायकवाड (वय 39, रा. भाचरवाडी) याने सुर्यदीप उर्फ दादासो राजाराम पाटील (वय 25, रा. कोलोली) याच्यावर बंदुकीतून गोळी झाडून त्याचा खून केला होता. घटनेनंतर आरोपी पोपट, त्याच्या कुटुंबियांनी मृताच्या सासरच्या घरावर हल्ला केला होता. सुर्यदीप पाटील खून प्रकरण हे भाचरवाडी खून खटला म्हणून न्यायालयात दाखल झाले होते. या खटल्यात जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी गुरूवारी आरोपी पोपट गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी काम पाहिले.

पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी येथे पोपट श्रीपती गायकवाड (वय 39) राहतो. याच गावात फिर्यादी रामचंद्र ज्ञानू जाधव कुटुंबासह राहतात. पोपट गायकवाडने रामचंद्र जाधव यांची मुलगी आश्विनीसाठी मागणी घातली होती. पण पोपट गायकवाडचे पहिले लग्न झाले असल्यानें त्यांनी याला विरोध केला होता. याचा राग पोपट गायकवाडच्या मनात धुमसत होता. त्यानंतर रामचंद्र जाधव यांनी मुलगी आश्विनीचा विवाह पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील सुर्यदीप उर्फ दादासो राजाराम पाटील (वय 25) याच्याशी लावून दिला होता. अश्विनी आणि सुर्यदीप पाटील यांचा विवाह 30 जुलै 2013 रोजी झाला. त्यानंतर आश्विनीला दिवस गेल्याने ती 12 जून 2014 रोजी माहेरी भाचरवाडी येथे वडील रामचंद्र जाधव यांच्याकडे रहायला आली होती.

कोलोलीहून सुर्यदीप पाटील हा मोटारसायकलवरून 13 जून 2014 रोजी पत्नी आश्विनीला नेण्यासाठी भाचरवाडीला आला होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो पत्नीसमवेत मोटारसायकलवरून गावी निघाला असता संशयित पोपट  गायकवाडने त्याला शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी रामचंद्र जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तो घरी निघून गेला. दरम्यान, शिवीगाळ का केलीस, याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी रामचंद्र जाधव, जावई सुर्यदीप पाटील, जाधव यांची पत्नी व मुलगा अमोल हे पोपट गायकवाडच्या घराकडे गेले. यावेळी पोपट गायकवाड दारातच बारा बोअरची बंदूक घेऊन उभा होता. त्याने दारातूनच घराकडे येणाऱया सुर्यदीप पाटीलवर बंदुकीतून गोळी झाडली. यात सुर्यदीप पाटील गंभीर जखमी झाला होता.

सुर्यदीप पाटील याच्यावर गोळीबार केल्यानंतर संशयित पोपट गायकवाड याने पत्नी शोभा, मुलगा विक्रम, आई रंगुबाई, वडील श्रीपती, भाऊ लक्ष्मण आणि सुरेश गायकवाड यांच्यासह रामचंद्र जाधव यांच्या घरावरही हल्ला केला होता. पोपट गायकवाडच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुर्यदीप पाटीलला उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याचा मृत्यू झाला. सुर्यदीप पाटील याच्या खून प्रकरणी आरोपी पोपट गायकवाडविरोधात रामचंद्र जाधव यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेचा तपास पन्हाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांनी केला होता.

कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयात न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्यासमोर सुर्यदीप पाटील खून प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले होते. या खटल्याची सुनावणीही न्यायाधीश साळुंखेंसमोर सुरू होती. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी या खटल्यात 18 साक्षीदार तपासले. त्यातील 3 साक्षीदार फितुर झाले. आरोपीच्यावतीने ऍड. जी. के. देसाई यांनी काम पाहिले.

न्यायाधीश साळुंखे यांनी भाचरवाडी खून खटल्यात फिर्यादी रामचंद्र जाधव, मुलगा अमोल जाधव, मृताची पत्नी अश्विनी सुर्यदीप पाटील, सहायक फौजदार हमीद शेख, साताप्पा खोत, प्रकाश जाधव, संदीप शेलार, विजयकुमार शिरोले, डॉ.  मकानदार, उपजिल्हाधिकारी शंकर बरगे, अंजन पोवार, तपासी अधिकारी यशवंत गवारे, कॉन्स्टेंबल सुतार यांची साक्ष आणि विशेष सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय़ मानून आरोपी पोपट गायकवाड याला गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा आणि 10 हजार रूपयांचा दंड ठोठावला. भारतीय हत्यार कायद्यांतर्गत आरोपीस दोन वर्षे सक्तमजुरी, 2 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यातील अन्य सहा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती न्यायालयातून देण्यात आली. सरकारी वकील अशोक रणदिवे यांना ऍड. अमित महाडीक, ऍड. क्रांती पाटील यांचे सहकार्य लाभले.