|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दानवेंना पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच नाही

दानवेंना पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच नाही 

प्रतिनिधी/ खेड

आधी शेतकऱयांच्या थोबाडीत मारायची अन् मग माफी मागायची, हे वर्तन अशोभनीयच असून शेतकऱयांबाबत अवमानकारक मुक्ताफळे उधळणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच नाही, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ठणकावले.

जामगे येथील कोटेश्वरी मानाई देवीच्या उत्सवासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम येथे आले आहेत. ज्या शेतकऱयांच्या हितासाठी सत्तेत राहून झटतो, त्याच शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्याबद्दल बेजबाबदार वक्तव्य करणाऱया रावसाहेब दानवे यांनी पदाचा तत्काळ राजीनामाच द्यायला हवा. आपले त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असले तरी शेतकऱयांबाबत केलेले वक्तव्य अशोभनीयच आहे. त्यांनी माफीनामा लिहून दिला तरी शेतकरी त्यांना कदापी माफ करणार नसल्याचा टोलाही लगावला.

जामगे लवकरच पर्यटनाच्या नकाशावर झळकणार असून श्री कोटेश्वरी मानाई देवी मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासाठी मंजूर झालेल्या 5 कोटी 44 लाखाच्या निधीतून सुरू असलेले सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. देश-विदेशातील पर्यटक भेट देतील, अशी ‘शिव-सृष्टी’ वसवली जाणार असून याद्वारे बेरोजगारांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांमध्ये कोटय़वधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असून या बाबतच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. एकीकडे शासन जलशिवार योजनेच्या माध्यमातून जनतेला मुबलक प्रमाणात प्यायला पाणी कसे मिळेल? या दृष्टीने पाणी अडवण्यावर भर देत असताना दुसरीकडे शासनाचा कोटय़वधी रूपयांचा निधी लाटून जनतेच्या तोंडचे पाणी काढण्याचे काम करणाऱयांवर कडक कारवाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भ्रष्टाचारात ज्यांचे ज्यांचे हात बरबटले आहेत, त्या लोकप्रतिनिधींसह दोषी अधिकाऱयांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर रितसर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.