|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हा रूग्णालयात नैसर्गिक प्रसुतींमध्ये वाढ

जिल्हा रूग्णालयात नैसर्गिक प्रसुतींमध्ये वाढ 

सौ.जान्हवी पाटील/ रत्नागिरी

बदलती जीवनशैली व व्यावसायिकतेचा अतिरेक यामुळे प्रसुतीसाठी शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारण्याचे प्रमाण सर्वत्र वाढत असताना जिल्हा शासकीय रूग्णालयात मात्र नैसर्गिक प्रसुतीवरच भर दिला आहे. गेल्या चार वर्षात शासकीय रूग्णालयात झालेल्या 10 हजार 248 प्रसुत्यांपैकी सुमारे 7 हजार प्रसुत्या नैसर्गिकरित्या झाल्या. खासगी रूग्णालये व अन्य जिल्हय़ांमधील शासकीय रूग्णांलयांच्या तुलनेत नैसर्गिक प्रसुतीमध्ये रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय सरस असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. डी. आरसुळकर यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितली.

सध्या राज्यात सर्वत्र सिझरिंगचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य खात्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे. खासगी रूग्णालयांमध्ये सिझरचे प्रमाण वाढत असताना जिल्हा शासकीय रूग्णालयात हे प्रमाण कमी होवू लागले आहे. गरोदर मातांनी योग्य सकस आहार व योग्य व्यायामाचा अवलंब केल्यास नैसर्गिक प्रसुती सोयीस्कर ठरू शकते. मात्र बदलती जीवनशैली, फास्टफूड आणि ताणतणावामुळे यातून निर्माण झालेल्या समस्यांमुळे सुरक्षीत प्रसुतीसाठी शस्त्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. अत्यावश्यकवेळी व अतिशय गंभीर गुंतागुंतीच्या प्रकरणात प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यकच आहेत. मात्र अनेकदा केवळ व्यावसायिक हेतूने डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. हे प्रमाण खासगी रूग्णालयात अधिक आहे.

रत्नागिरी शासकीय रूग्णालयात 70 टक्केहून अधिक प्रसुती या नैसर्गिकरित्याच होतात. काही प्रकरणांमध्ये मात्र गरजेनुसार सिझरींगचा अवलंब केला जातो. खासगी रूग्णालयात सिझरसाठी 20 ते 30 हजार इतकी फी आहे. सिझरनंतर संबंधित मातेला खूप काळजी घ्यावी लागते. तशी काळजी न घेतल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होतो. हे प्रमाण कमी करायचे असेल तर गरोदर मातांनी तितकीच काळजी घेतली पाहिजे. गरोदरपणात ज्या दक्षता घ्यायला हव्यात, त्या घेतल्याच गेल्या पाहिजे. तरच नैसर्गिक प्रसुतीचे प्रमाण आणखीन वाढेल, असा विश्वास डॉ.आरसुळकर यांनी व्यक्त केला.