|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रसारमध्यामांवर घातलेल्या बंधनांचा काँग्रेसकडून निषेध

प्रसारमध्यामांवर घातलेल्या बंधनांचा काँग्रेसकडून निषेध 

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि त्यांच्या सरकारने प्रसारमाध्यमांवर घातलेल्या बंधनांचा व त्यासंदर्भात काढलेल्य परिपत्रकाचा काँग्रेस पक्षाने निषेध केला असून हा विषय पंतप्रधान नरेंद मोदीपर्यंत तसेच राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे ठरविले आहे. हे परिपत्रक मागे घ्यावे व पर्रीकर सरकारने प्रसारमाध्यमांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोव्याचे प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील मागणी करून सांगितले की पर्रीकर सरकारची ही कृती पत्रकारांची मुस्कटदाबी करणारी असून निषेधार्ह आहे. अस्थिर सरकार आणि मंत्र्यांवर अंकुश नसल्यामुळे भ्रष्टाचाराना खत पाणी घालून वाट मोकळी करून देण्यासाठीच सरकारने पत्रकारांचा आवाज दडपून टाकण्यासाठी सदर कृती केली आहे. विरोधी पक्षात असताना ते पारदर्शक प्रशासनाची – कारभाराची भाषा करीत होते आणि आता चुकीच्या मार्गाने सत्ता मिळवून ते पत्रकारांमध्ये घबराट निर्माण करीत आहेत. खर म्हणजे पत्रकारांना बंधने घालण्याची गरज नाही. यापूर्वी कोणत्याच सरकारने गोव्यात व इतरत्र अशी कृती केलेली नाही असे सांगून चोडणकर यांनी तिचे जोरदार खंडन केले.

लोकायुक्त आणि आरटीआयची भाजप सरकारने कशी हालत टाकली आहे ते उघडपणे दिसते. पर्रीकर सरकारला प्रसारमाध्यमांना अडवण्याचा कोणताही अधिकार नाही. सरकार, प्रशासन आणि कारभाराची माहिती पत्रकारांना व प्रसारमाध्यमे व पर्यायाने जनतेला मिळालीच पाहिजे ती कोणी रोखू शकत नाही आणि ती लपवण्यासाठी हा खटाटोप असल्याच टीका चोडणकर यांनी केली.

पोलिसांचावापर करून वृत्तपत्रांची सतावणूक या पर्रीकर सरकारने चाखली असून 5 वृत्तपत्रांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. प्रसिद्धिस आलेल्या बातमीची माहिती कोठून मिळाली? ते सांगण्यासाठी दबावतंत्र वापरून त्या नोटीसा पोलिसांकरवी पाठवण्यात आल्या आहे. बातम्या कोठून मिळतात? हे वृत्तपत्रांनी पोलिसांना कशाला सांगावे? असा प्रश्न चोडणकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसून पर्रीकर पणजी मतदारसंघातून विधानसभा पोटनिवडणूक लढण्याची घोषणा करतात हे आक्षेपार्ह असून त्यांनी ती पक्ष कार्यालयात करण्याची गरज होती. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन  फेरनिवडणूक लढवावी असे आव्हान चोडणकर यांनी त्यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या दालनातून केलेली घोषणा म्हणजे सरकारी यंत्रणेचा गैरवापर असून त्यांनी पदाचा राजीनामा देवून लढत द्यावी असे चोडणकर म्हणाले.