|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीत रेल्वे ट्रकशेजारी वृद्धेचा मृतदेह

सावंतवाडीत रेल्वे ट्रकशेजारी वृद्धेचा मृतदेह 

सावंतवाडी : मळगाव रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर एका वृद्ध महिलेचा मृतदेह रेल्वे ट्रकवर शनिवारी आढळला. ही महिला अनोळखी असून 70 ते 80 वयोगटातील आहे. पुणे-एर्नाकुलम या जलद गाडीतून ती पडली असावी, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही महिला घरंदाज असावी, असे तिच्या वर्णनावरून दिसत आहे. तिची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे तपासी अंमलदार पोलीस हवालदार गजेंद्र भिसे यांनी सांगितले.

रेल्वे ट्रकवर अनोळखी महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह शनिवारी सकाळी मळगाव रेल्वेस्टेशनजवळ रेल्वे ब्रीजखाली असल्याची माहिती गांधीधाम-नागरकोई गाडीच्या चालकाने स्टेशनमास्तर अरुण शेटये यांना सकाळी 7.20 वाजता दिली. त्यानंतर शेटये यांनी तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनास्थळी हवालदार गजेंद्र भिसे, नितीन उमरसकर यांनी पंचनामा केला.

सदर वृद्ध महिला पुणे-एर्नाकुलम रेल्वेने प्रवास करत असावी. त्यावेळी ती बाथरुममध्ये जाताना बाहेर फेकली गेली की तिने आत्महत्या केली, हे तिची ओळख पटल्यानंतर स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. तिचे हात व पाय निकामी झाले असून डोके रक्ताने माखले होते. तिच्या डाव्या हातावर फुलाचे चित्र गोंदले आहे. तसेच गळय़ात मंगळसूत्र होते. मोरपंखी लाल काठाची साडी, लालसर रंगाचा ब्लाऊज आहे. वर्णनावरून ती महाराष्ट्रीयन असून चांगल्या घराण्यातील असावी, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. मृतदेहाजवळ कोणतेही सामान अगर ओळख पटण्यासारख्या वस्तू आढळल्या नाहीत. मृतदेह विच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अहवालानुसार तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. ही वृद्ध महिला कुठल्या रेल्वेने प्रवास करत होती? तिच्यासोबत तिचे नातेवाईक होते का, याबाबत पोलीस तपास करणार आहेत.

Related posts: