|Monday, June 17, 2019
You are here: Home » क्रिडा » ण्मुंबईविरुद्ध पराभवामुळे कोलकातासमोर जर-तरची समीकरणे!

ण्मुंबईविरुद्ध पराभवामुळे कोलकातासमोर जर-तरची समीकरणे! 

वृत्तसंस्था/ कोलकाता

मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचे या हंगामातील भवितव्य अन्य संघांवर अवलंबून असेल, असे शनिवारी स्पष्ट झाले. मुंबईने ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 5 बाद 173 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात कोलकात्याला 8 बाद 164 धावांवरच समाधान मानावे लागले. कोलकाताचा या हंगामातील हा सहावा पराभव ठरला.

कोलकात्याचा संघ सध्या 16 गुणांसह तिसऱया स्थानी असून त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान किंग्स इलेव्हन पंजाब (14 गुण) व रायझिंग पुणे सुपरजायंट (16 गुण) यांच्यातील लढतीवर अवलंबून असणार आहे. पंजाबने आजचा सामना जिंकला तर या तिन्ही संघांचे समसमान 16 गुण होतील व अशा परिस्थितीत धावसरासरीच्या निकषावर उर्वरित 2 संघ कोणते असतील, हे निश्चित होईल.

या स्पर्धेत सर्वप्रथम प्ले-ऑफमध्ये स्थान प्राप्त करणाऱया मुंबईने हंगामातील दहावा विजय नोंदवत 20 गुणांसह आपले अव्वलस्थान आणखी भक्कम केले. विजयासाठी 174 धावांचे आव्हान असताना मनीष पांडेने कोलकात्यातर्फे सर्वाधिक 33 धावा केल्या. पण, पहिल्या टप्प्यात ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्याने याचे यजमान संघाला नंतर पराभवाच्या रुपाने मोल मोजावे लागले. मुंबईतर्फे टीम साऊदी, आर. विनयकुमार व हार्दिक पंडय़ा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

मुंबई इंडियन्स संघात चक्क 6 बदल

मुंबईने या लढतीसाठी तब्बल 6 बदल करताना पार्थिव पटेल, नितीश राणा, हरभजन सिंग, मिशेल मॅकक्लॅघन, जसप्रीत बुमराह व लसिथ मलिंगा यांच्याऐवजी अम्बाती रायुडू, सौरभ तिवारी, कृणाल पंडय़ा, विनयकुमार, मिशेल जॉन्सन व टीम साऊदी यांना संधी दिली. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने एकमेव बदल करताना ख्रिस वोक्सऐवजी ट्रेंट बोल्टला मैदानात उतरवले होते.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सतर्फे अम्बाती रायुडूने 37 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारांसह सर्वाधिक 63 धावांचे योगदान दिले तर सलामीला उतरलेल्या सौरभ तिवारीने देखील 43 चेंडूत 9 चौकारांसह 52 धावांची तडफदार अर्धशतकी खेळी साकारली. लेंडल सिमॉन्स मात्र भोपळा फोडण्यापूर्वीच बाद झाला. केरॉन पोलार्डला 13 धावांवर तंबूत परतावे लागले तर हार्दिक पंडय़ा 1 व कृणाल पंडय़ा शून्यावर नाबाद राहिले.

गोलंदाजीच्या आघाडीवर कोलकातातर्फे ट्रेंट बोल्टने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 30 धावात 2 तर अंकित राजपूत (1/14), कुलदीप यादव (1/25) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या लढतीत कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते.

धावफलक

मुंबई इंडियन्स : सौरभ तिवारी धावचीत (यादव) 52 (43 चेंडूत 9 चौकार), लेंडल सिमॉन्स झे. नारायण, गो. बोल्ट 0 (5 चेंडू), रोहित शर्मा पायचीत राजपूत 27 (21 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), अम्बाती रायुडू यष्टीचीत उत्थप्पा, गो. कुलदीप यादव 63 (37 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), केरॉन पोलार्ड झे. पठाण, गो. बोल्ट 13 (11 चेंडूत 1 षटकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 1 (2 चेंडू), कृणाल पंडय़ा नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 17. एकूण 20 षटकात 5/173.

गडी बाद होण्याचा क्रम

1-12 (सिमॉन्स), 2-69 (रोहित शर्मा), 3-130 (तिवारी), 4-168 (रायुडू), 5-170 (पोलार्ड).

गोलंदाजी

ट्रेंट बोल्ट 4-0-30-2, ग्रँडहोम 2-0-16-0, उमेश यादव 4-0-40-0, सुनील नारायण 4-0-37-0, कुलदीप यादव 3-0-25-1, अंकित राजपूत 3-0-14-1.

कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नारायण झे. हार्दिक पंडय़ा, गो. साऊदी 0 (4 चेंडू), ख्रिस लिन झे. बदली (जे. सुचिथ), गो. विनयकुमार 26 (14 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), गौतम गंभीर झे. कर्ण शर्मा, गो. जॉन्सन 21 (16 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), रॉबिन उत्थप्पा झे. रोहित शर्मा, गो. कर्ण शर्मा 2 (4 चेंडू), मनीष पांडे झे. बदली (जे. सुचिथ), गो. हार्दिक पंडय़ा 33 (33 चेंडूत 2 चौकार), युसूफ पठाण झे. हार्दिक, गो. विनयकुमार 20 (7 चेंडूत 3 षटकार), कॉलिन ग्रृँडहोम त्रि. गो. हार्दिक 16 (15 चेंडू), कुलदीप यादव झे. अम्बाती रायुडू, गो. साऊदी 16 (15 चेंडूत 2 चौकार), उमेश यादव नाबाद 4, ट्रेंट बोल्ट नाबाद 5 (8 चेंडू). अवांतर 8. एकूण 20 षटकात 8/164.

गडी बाद होण्याचा क्रम

1-0 (नारायण), 2-41 (गंभीर), 3-53 (उत्थप्पा), 4-53 (लिन), 5-87 (पठाण), 6-128 (ग्रँडहोम), 7-149 (पांडे), 8-158 (कुलदीप यादव).

गोलंदाजी

टीम साऊदी 4-1-39-2, मिशेल जॉन्सन 4-0-30-1, कर्ण शर्मा 3-0-26-1, आर. विनयकुमार 3-0-31-2, कृणाल पंडय़ा 2-0-14-0, हार्दिक पंडय़ा 4-0-22-2.