|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सहस्त्रार्जुनाची वनक्रीडा

सहस्त्रार्जुनाची वनक्रीडा 

आईवडील मुलांवर रागावतात कारण त्यांचे आपल्या मुलांवर निस्सीम प्रेम असते. शिक्षक विद्यार्थ्यांवर रागावतात कारण त्यांचे आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम असते. ज्ञानदेव, म. गांधी, मार्टीन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अन्यायाबद्दल रागावतात कारण त्यांच्या मनात अपार करुणा असते. क्रोधाचा जन्म जेक्हा प्रेमापोटी किंवा करुणेपोटी होतो तेव्हा तो क्रोध क्षम्य मानता येईल. अर्थात अशा क्रोधावर बुद्धीचे नियंत्रण मात्र हवे. अकारण आणि अनियंत्रित क्रोध मात्र नेहमीच विनाशकारी असतो.

परद्रव्य आणि परनारी याविषयी मनात कामना असेल तर ही कामना पूर्ण झाली नाही तर जो क्रोध निर्माण होतो तो घातक होय. ज्ञानाचा अहंकार देखील अकारण क्रोधाला जन्म देतो. त्यामुळे क्रोध धारण करणाऱया व्यक्तीपाशी या तीन गोष्टी असता कामा नयेत असे जमदग्नी सांगतात.

जमदग्नी ऋषींचे म्हणणे मान्य करून परशुराम म्हणाला, “ताता, मी आपल्या चरणांचे तीर्थ प्राशन केले आहे. त्या तीर्थामुळे माझ्या ठिकाणी समर्थता आली असून आपला क्रोध धारण करण्यात मला भय नाही.’’ नंतर त्याने पित्याला नमन करून, प्रार्थनेने चरणतीर्थ घेतले आणि त्या तीर्थांबरोबर क्रोधाचेही स्वतः प्राशन केले. त्यावेळी क्रोध म्हणतात. “हे भार्गवा, (परशुराम) तू दुष्टांचे निर्दाळण करशील, त्यावेळी संग्रामात हे भृगुवीस, मी तुला सहाय्यकारी होईन.’’

इकडे रेणुकेला आदिशक्तीने दृष्टांत देऊन सांगितले की सहस्त्रार्जुन शिकारीसाठी तुझ्या आश्रमात येईल तेव्हा कार्यसिद्धीसाठी, त्याचे पूजन कर. ऋषींकडून त्याला ससैन्य आमंत्रण द्यायला लाव. त्रिजगतात जे दुर्लभ उपचार ते ते पूर्ण करण्यासाठी ऋषींना सांगून कामधेनू त्यासाठी आणव. आपले इष्ट कार्य साधण्यासाठी त्या कामधेनूकडे आवश्यक ते माग. त्या नृपतीचा पूजोपचाराने सत्कार कर.

काही काळ गेल्यावर एकदा काय झाले ते एकनाथ महाराज वर्णन करतात.

सहस्त्रार्जुन वनक्रीडेसी । आता जमदग्नि आश्रमासी । रेणुका प्रार्थोनिया पतीसी। राजा कटकेसी निमंत्रिला।।

सहस्त्रार्जुन वनक्रीडेसाठी म्हणून जमदग्नी ऋषींच्या आश्रमाकडे आला. रेणुकेने पतीला विनंती करून राजाला ससैन्य निमंत्रण द्यायला सांगितले. त्याप्रमाणे ऋषींनी राजाला निमंत्रण दिले. त्यावेळी जमदग्नी व त्यांची पत्नी रेणुका यांच्यामध्ये काय संवाद झाला पहा-

ऋषी म्हणे राजासी केवळ । आणोनि घालू फळमूळ । जी म्हणे आश्रमधर्म विकळ । अन्न सकळ तृप्त कीजे ।। आश्रमा आले ते ते अतीत । तृप्त करावे समस्त । तुम्ही सामथ्ये अति समर्थ । विकळ परमार्थ न करावा ।। यावी मात्र कामधेनू । आणोनि द्यावे दिव्यान्न । राजा विभूति श्रीभगवान । यथोक्त पूजन करावे त्याचे।।

Related posts: