|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मान्सूनची अंदमानात धडक

मान्सूनची अंदमानात धडक 

सहा दिवस आधीच दाखल : केरळातही लवकर आगमन होण्याची शक्यता : हवामान विभागाची माहिती

पुणे / प्रतिनिधी

साऱया देशवासीयांच्या नजरा लागून राहिलेला मान्सून रविवारीच अंदमान-निकोबार बेटावर दाखल झाला. यासंबंधीची माहिती हवामान विभागाकडून रविवारी दुपारी जाहीर करण्यात आली. दरवर्षी साधारणपणे 20 मे च्या आसपास मान्सून अंदमानात दाखल होतो. पण यावर्षी सहा दिवस आधीच अंदमानात आल्याने केरळातही त्याचे लवकर आगमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अंदमान-निकोबार परिसरात पडत असलेला पाऊस, वाऱयांचा वेग याबाबी लक्षात घेऊन अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याचे घोषित करण्यात आले. पुढील 72 तासात बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, निकोबार बेटे आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात आगमन होण्याच्या दृष्टीने अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यापूर्वी हवामान विभागाने 15 मे रोजी मान्सून अंदमानला येईल असे जाहीर केले होते. सर्वसाधारणपणे दक्षिण पश्चिम मान्सूनचे आगमन 20 मे रोजी अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर 25 मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकापासून म्यानमारपर्यंत आगमन होते. त्यानंतर 1 जून रोजी केरळ येथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होतो. तळकोकणात पाच ते सात जून दरम्यान मान्सूनचा प्रवेश होतो. त्यानंतर विविध भागात सक्रिय होऊन 15 जुलैपर्यंत मान्सून देश व्यापतो. आताची पोषक परिस्थिती लक्षात घेता दरवर्षीपेक्षा साधारण 6 दिवस लवकर मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. मान्सून लवकर दाखल झाल्याने भारतातही त्याचे लवकर आगमन होण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात मान्सूनचा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने यंदा मान्सून 96 टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवडय़ांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

येत्या दोन दिवसात नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, छत्तीसगड आणि विदर्भात उष्णतेची लाट  असणार आहे.

पावसाचा जोर वाढणार, वाऱयाच्या वेगातही बदल

अंदमान-निकोबार बेटांवर मंगळवारपर्यंत अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱयामुळे समुद्र खवळणार असल्याने 17 मे पर्यंत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

यंदा पाऊस सरासरीत

हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, यंदा जून ते सप्टेंबर या नैर्त्रुत्य मोसमी पावसाच्या (मान्सून) कालावधीत सरासरीच्या 96 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दोन वर्षांच्या दुष्काळानंतर 2016 साली पावसाने देशभरात दमदार हजेरी लावली. यावर्षी सरासरीच्या 97 टक्के पाऊस झाल्याने देशातील दुष्काळ धुऊन काढला. त्यानंतर सलग दुसऱया वर्षी म्हणजे 2017 लाही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. आता मान्सूनच्या चाहुलीने बळीराजासह सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Related posts: