|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाची खेळाडूंना धमकी

ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाची खेळाडूंना धमकी 

वृत्तसंस्था/ सिडनी

गेल्या कांही दिवसापासून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ यांच्यात नव्या करारातील अटी संदर्भात मतभेद विकोपाला गेले आहेत. दरम्यान येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱया ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी मंडळाच्या नव्या करारावर स्वाक्षऱया केल्या नाहीत तर त्यांना बेकार राहावे लागेल, अशी धमकी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आली आहे.

आगामी ऍशेस मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या नव्या करारातील काही जाचक अटी असल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेने खेळाडूंना या नव्या करारावर स्वाक्षऱया करण्यास विरोध केला आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी केलेल्या संपावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाकडून वरील धमकी दिल्याचे सूचित केले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने आपल्या देशाच्या क्रिकेटपटूंसाठी नवा करार करण्याची योजना आखली या नव्या करारातील अटीनुसार क्रिकेटपटूंच्या मानधनामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ केल्याचे नमूद केले आहे. विशेषत: ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंना त्याचा अधिक लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. पण गेली वीस वर्षे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यांतून मिळणाऱया मिळकतीच्या रक्कमेतील काही टक्के रक्कम दिली जात असे पण क्रिकेटपटूंसाठी तयार करण्यात आलेल्या या नव्या करारामध्ये खेळाडूंना या ठराविक रक्कमेपासून मंडळाने दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन व्यावसायिक क्रिकेटपटूंनी गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा नियंत्रण मंडळातर्फे मानधनाची ऑफर फेटाळून लावली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हे नवे धोरण क्रिकेट प्रशासकांना अधिक लाभदायक ठरणारे असून क्रिकेटचे फार मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याचे म्हटले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेल्या मार्चमध्ये क्रिकेटपटूंच्या कराराची योजना जाहीर केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेने नव्या समस्याबाबत चर्चा करून त्यावर सामोपचाराने तोडगा काढणे क्रिकेटच्या हिताचे ठरेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख सुदरलँड यांनी सूचित केले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना या नव्या करारावर 30 जून अखेर स्वाक्षरी करावी लागेल, अशी अट घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी ही अट मान्य केली नाही तर त्यांच्या कराराची मुदत संपुष्टात येईल आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सादर केलेल्या नव्या करारात कोणताही बदल केला जाणार नाही आणि खेळाडूंना या करारावर स्वाक्षरी करण्याची सक्ती ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने केली आहे. आगामी ऍशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी हा नवा करार मान्य केला नाही तर ते बेकार होतील, अशी धमकी वजा इशारा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिला आहे. या संदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दर्शविला आहे.