|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » परमेश्वराची इच्छा असल्यास राजकारणात येईन : रजनीकांत

परमेश्वराची इच्छा असल्यास राजकारणात येईन : रजनीकांत 

वृत्तसंस्था /  चेन्नई

तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार रजनीकांत यांनी सोमवारी राजकारणात प्रवेश करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता पूर्णपणे न फेटाळता जर देवाची इच्छा असेल तर राजकारणात उतरू असे रजनीकांत यांनी म्हटले आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहण्याचा नेहमीच प्रयत्न करणाऱया या दिग्गज अभित्याने सोमवारी आपल्या चाहत्यांची भेट घेतली आहे.

आपण आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर काय करावे याचा निर्णय परमेश्वरच घेत असतो. सध्या तरी मी अभिनेता असून त्यासाठीच्या जबाबदाऱया पूर्ण करत आहेत. जर देवाची इच्छा असेल तर भविष्यात मी राजकारणात येईन. जर मी राजकारणाच्या क्षेत्रात उतरलो तर या क्षेत्रात पैसे कमविण्यासाठी दाखल झालेल्यांसोबत नसेन. अशा लोकांसोबत मी काम करणार नाही अशी भूमिका 66 वर्षीय रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांना संबोधित करताना मांडली.

रजनीकांत यांनी यावेळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकला 1996 साली दिलेल्या पाठिंब्याबद्दलही मत मांडले. त्यावेळी घेतलेला तो निर्णय आकस्मिक होता. 21 वर्षांपूर्वी राजकीय आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय माझ्यासाठी चुकीचा होता. अनेक राजकीय नेत्यांकडून माझ्या नावाचा गैरवापर झाला, अनेकांनी माझे नाव वापरून पैसा कमाविला. माझा पाठिंबा पक्षासाठी नव्हता असे स्पष्टीकरण रजनीकांत यांनी दिले.

चालू महिन्याच्या प्रारंभी काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री नगमा यांनी रजनीकांत यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाविषयीच्या चर्चेला बळ मिळाले होते. तर रजनीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध  चांगले असल्याचे मानले जाते. एप्रिल 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागण्याआधी मोदींनी रजनीकांत यांची भेट घेतली होती.

धूम्रपान टाळा

रजनीकांत यांनी यावेळी आपल्या चाहत्यांना मद्यपान आणि धूम्रपानापासून लांब राहण्याचा सल्ला दिला. अशी व्यसने लोकांच्या प्रकृतीला नुकसान पोहोचवितात, त्याचबरोबर त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर प्रभाव टाकतात. आपली पूर्ण संपत्ती मद्यपानासाठी लोक कशी गमावू शकतात याचे मला नेहमीच आश्चर्य वाटते. मद्यपानामुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होतो आणि यामुळे एखाद्याचा शेवट होतो. मला स्वतःलाच मद्यपान आणि धूम्रपानाचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यापासून दूर रहा असे आवाहन रजनीकांत यांनी केले.

Related posts: