|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती

मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती 

पुणे/ प्रतिनिधी

नैऋत्य मोसमी पावसाच्या (मान्सून) पुढील वाटचालीसाठी स्थिती अनुकूल असून, पुढील 48 तासात तो संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटासह बंगालचा काही भाग व्यापण्याची शक्यता हवामान विभागाकडून सोमवारी वर्तविण्यात आली.

 यावर्षी सहा दिवस आधीच म्हणजे रविवारी (14 मे) अंदमानात मान्सून दाखल झाला. आतापर्यंत त्याने आग्नेय बंगालचा उपसागर व निकोबार द्विपसमूह, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्र व्यापला आहे, तर पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

 दरम्यान, येत्या 24 तासात देशात जम्मू आणि काश्मीर, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक, लक्षद्विप येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर राज्यात पुढील 48 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात उष्णतेची लाट

दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. गेल्या 24 तासात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडय़ात मात्र हवामान कोरडे होते. कोकण-गोव्यात काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोवा व विदर्भाच्या उर्वरित काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सोमवारी सर्वांत जास्त तापमान ब्रम्हपुरी 46.2 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.

Related posts: