|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अनाधिकृत बांधकामांवर बुलडोझर

अनाधिकृत बांधकामांवर बुलडोझर 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरानजीक असलेल्या जागतिक वारसा असलेला कास पुष्प पठारावर गेल्या काही वर्षापासून बेकायदा बांधकामे सुरु आहेत. यामुळे कास पुष्प पठाराचे वैभव लोप पावत असून माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यावरुन कास पुष्प पठारावरील सर्व बेकायदा अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवणार असल्याचा गर्भीत इशाराच पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, शहरात अनेक ओढय़ावर अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणांच्याही अनुषंगानेही डिपीआरची अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पालिकेत 25 रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

पालकमंत्री शिवतारे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बेलत होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री शिवतारे म्हणाले, कास ते यवतेश्वर या निर्सगरम्य अशा ठिकाणावर अनाधिकृत बांधकामे होत असल्याच्या अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. ती बांधकामे तातडीने हटवण्यात यावीत, असे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कास पुष्प पठारावर झालेली अनाधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरणारच असे निक्षून त्यांनी सांगितले. दरम्यान, सातारा शहरातील ओढे-नाल्यांचे मूळ नकाशात रेखाटन नाही. त्यामुळे नक्की कोणती बांधकामे ओढे-नाल्यांच्या हद्दीत बांधण्यात आली आहे. याची 25 मे नंतर नगरपालिकेत बसून आढावा घेणार आहे. जी बांधकामे अनधिकृत निघतील त्यांना हटवण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार आहे, असे सांगितले.          

यंदा टँकरची संख्या निम्यावर..

राज्यात सातारा जिह्यात जलसंधारण व जलसंपदा खात्याचे 1 नंबरचे काम सुरु आहे. गेल्या दोन वर्षात जलयुक्त शिवारची कामे झालेल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या निम्यावर आली आहे. पालकमंत्री म्हणून जाबबदारी दिली होती. त्यावेळी उरमोडी सिंचन योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. ते आगामी पाच वर्षात पूर्ण होईल. तसेच जिहे-कटापूर योजना अवघ्या दोन वर्षात मार्गी लावण्याचे काम सुरु आहे. तसेच कोरेगाव तालुक्यातील वसना-वांगणा उपसा सिंचन योजनेचे काम मार्च महिन्याअखेर पूर्ण करणार आहे. जलसंधारण सर्वात जास्त काम जिह्यात करत आहे. जिह्यात ‘वॉटर कप’ स्पर्धेत सर्वाधिक गावांनी सहभाग घेतला. जलसंधारण ही आता नुसती योजना राहिली नाही तर ती चळवळ झाली आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या कामांमुळे यंदा टँकरची संख्या कमी झाली आहे. मोठय़ा प्रमाणात पाणी साठा झाल्याने गहू, कांदा, हरभरा तसेच ऊस, आले आणि हळदी सारख्या पिकांचे लागवड क्षेत्र वाढले आहे. या वर्षीपासून गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शेती हा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्याची मोहीम राज्य शासन हाती घेणार आहे.

गरीब कुटुंबांचा रोजगार बुडणार नाही

त्यामुळे पाण्याची पातळी वाढून जमीनीचा पोत वाढवण्यासाठी मदत होणार आहे. तसेच ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमधील शेतमजूर व श्रमिक ग्रामस्थांचे मनरेगाशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना निधी उपलब्ध होईल आणि गरीब कुटुंबाचा रोजगारही बुडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: