|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ओरोस खुर्द शाळा झाली डिजिटल

ओरोस खुर्द शाळा झाली डिजिटल 

सिंधुदुर्ग : पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या व स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओरोस खुर्द या शाळेला उर्जितावस्ता प्राप्त करून देण्यासाठी व शाळेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी एकत्रितपणे हाती घेतलेल्या शैक्षणिक उठाव मोहिमेंतर्गत ही शाळा डिजिटल करण्यात आली. कौतुकाची बाब ही की या डिजिटल शाळेचे उद्घाटनही या शाळेतील विद्यार्थ्याच्या हस्ते करण्यात आले. नुकताच केंद्रप्रमुख, शाळेतील शिक्षक व पालक-शिक्षक संघाचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

पहिली ते सहावीपर्यंत मान्यता असलेल्या या शाळेमध्ये गरीब शेतकऱयांचीच मुले शिकत असतात. या भागात हवे तसे शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे या शाळेची पटसंख्या कमी होत गेली. कालांतराने ती बंद होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली. मात्र याच दरम्यान या छोटय़ा शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेल्या शर्वरी राज्याध्यक्ष, शिक्षिका राधिका परुळेकर व श्रीमती कदम यांनी या शाळेमध्ये खूपच बदल घडवून आणले. अवघ्या एका वर्षातच या छोटय़ा शाळेतील मुले विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये तसेच स्पर्धांमध्ये तालुकास्तरावर चमकू लागली. शाळेतील प्रगतीत झालेला हा बदल लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनीही या शाळेकडे आपुलकीच्या भावनेतून बघायला सुरुवात केली आणि ग्रामस्थ व शिक्षकांच्या एकत्रित सहकार्यातून ही छोटी शाळा डिजिटल देखील झाली.

डिजिटल उद्घाटनप्रसंगी केंद्रप्रमुख तु. रा. चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वनाथ जैतापकर, यशवंत मेस्त्राr, अनंत मेस्त्राr, हेमंत सावंत, पंढरीनाथ सावंत तसेच माता-पालक संघ तसेच पालक-शिक्षक संघाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. विस्तार अधिकारी श्रीमती भाकरे व श्री. गायकवाड यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. शाळेतील विद्यार्थी प्रफुल्ल अनंत मेस्त्राr याच्या हस्ते डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षकांनी केलेला शैक्षणिक उठाव, प्रशासनाकडून मिळालेली प्रेरणा व ओरोस खुर्द ग्रामस्थांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून शाळेला हे डिजिटल स्वरुप देण शक्य झाल्याचे ग्रामस्थांनी म्हटले.

आता सातवीच्या वर्गालाही मान्यता मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जि. प. सदस्य नागेंद्र परब व पं. स. सदस्या श्रीमती कल्याणकर यांनी या कामी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कामील डिसोजा यांनी शालेय साहित्य खरेदीसाठी कायमस्वरुपी ठेव बँकेत जमा केली आहे. ग्रामस्थांनी पाण्याची टाकी दिली. शाळेसाठी कायमस्वरुपी स्टेज उभारण्यासाठीही ग्रामस्थांनी पाऊले उचलली आहेत.