|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » खंडणीसाठी आरटीओला मारहाण

खंडणीसाठी आरटीओला मारहाण 

बांदा : इन्सुली-आरटीओ तपासणी नाका येथील मोटार वाहन निरीक्षक शशिकांत सीताराम पंडित (52) यांना इन्सुली कुडवटेंब येथील प्रसाद गजानन वेंगुर्लेकर (42) याने सोमवारी रात्री खंडणीसाठी बेदम मारहाण केल्याची तक्रार आहे. वेंगुर्लेकर याने आरटीओ तपासणी नाक्यावरील कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पंडित यांनी बांदा पोलीस ठाण्यात वेंगुर्लेकर याच्याविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार दिली असून वेंगुर्लेकरविरोधात खंडणी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेंगुर्लेकर याला नंतर अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वेंगुर्लेकर याने पंडित यांच्याकडे महिन्याला 25 हजार रुपये खंडणीची मागणी केल्याची तक्रार आहे.

‘15 मे रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास आरटीओ तपासणी नाका येथे प्रसाद वेंगुर्लेकर कारने आला. तपासणी कार्यालयात जाऊन आरटीओ निरीक्षक शशिकांत पंडित यांना दमदाटी केली. आपणास दर महिन्याला 25 हजार रुपये व एका मंदिरासाठी वर्षाला 25 हजार रु. अशी खंडणी मागितली. तसेच धमकी देत अंगावर धाव घेत गणवेशाला हात घालून स्टार तोडला. मागितलेली रक्कम न दिल्यास या ठिकाणी काम करू देणार नाही, असे सांगत मारण्याची धमकी दिली. कार्यालयातील खुर्ची फेकून टेबलावरील रजिस्टर, कागदपत्रे फेकून दिले. शासकीय कामात अडथळा आणला,’ अशी तक्रार मोटार वाहन निरीक्षक शशिकांत पंडित यांनी बांदा पोलीस ठाण्यात दिली.

इन्सुली येथील प्रसाद वेंगुर्लेकर याने यापूर्वी 7 मे रोजी तपासणी नाका येथे येऊन पैशाची मागणी केली होती. तसेच रक्कम न दिल्यास धमकी दिली होती. या धमकीबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱयांना माहिती दिली होती, असे पंडित यांनी सांगितले. 15 मे रोजी घटना सुरू असताना प्रसाद वेंगुर्लेकर याने तपासणी व वाहन नोंदणीसाठी येणाऱया वाहन चालकांना अटकाव केला. वाहनांची नोंद करायची नाही, असे सांगून तो त्यांना हिसकावून लावत होता. यावेळी डय़ुटीवर अन्य कर्मचारी गणेश जाधव व अजय तरवळ होते, असेही तक्रारीत नमूद आहे. दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी शासकीय कामात अडथळा, धक्काबुक्की, शिवीगाळ तसेच मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रसाद वेंगुर्लेकरविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. गुन्हय़ातील बेझा कार जप्त करण्यात आली. वेंगुर्लेकर याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनवली, अशी माहिती पोलीस कळेकर यांनी दिली.