|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पश्चिम बंगाल नगरपालिका निवडणुकीत तृणमूलची बाजी

पश्चिम बंगाल नगरपालिका निवडणुकीत तृणमूलची बाजी 

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील सात नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे. पुजाली, मिरिक, रायगंज आणि डोमकल येथील नगरपालिकांमध्ये तृणमूल काँग्रेसने सत्ता काबीज केली. तर दार्जिलिंग, कुर्सिगांग आणि कलिम्पोंग येथील पालिकांमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) आणि भाजप आघाडीने यश मिळवले. 14 मे रोजी सात नगरपालिकांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीमध्येही डाव्यांसह काँग्रेसची पराभवाची मालिका कायम राहिली आहे.

या निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे तीन दशकानंतर मिरिक नगरपालिका निवडणुकीत स्थानिक पक्षांना मतदारांनी नाकारत तृणमूल काँग्रेसला कौल दिला. येथे 9 पैकी सहा जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत तृणमूलने बाजी मारली. तर रायगंज पालिकेमध्ये 27 पैकी 24 जागांवर विजय मिळवत काँग्रेसला सत्ताबाहय़ केले. 24 परगाना जिल्हय़ातील पुजाली नगरपालिकेमधील 16 पैकी 12 जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसने सत्ता अबाधित ठेवली. जीजेएमला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. मुर्शिदाबादमधील डोमकल येथेही 21 जागांपैकी 20 जागा जिंकत तृणमूल काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले.

अपेक्षेप्रमाणे दार्जिलिंग नगरपालिका निवडणुकीत ‘जीजेएम’ने आपले वर्चस्व कायम राखत 32 पैकी 31 जागांवर विजय मिळवला. येथे तृणमूल काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. कुर्सियांग येथे ‘जीजेएम’ला 20 पैकी 17 जागांवर विजय मिळाला. येथे तृणमूलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. 23 पैकी 18 जागा जिंकत कलिम्पोंग पालिकेवर जीजेएम-भाजप आघाडीने झेंडा फडकविला.