|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिरोळ दत्त कारखान्यावर सेंद्रीय शेतीचा उपक्रम राबविणाऱया शेतकऱयांचे मार्गदर्शन

शिरोळ दत्त कारखान्यावर सेंद्रीय शेतीचा उपक्रम राबविणाऱया शेतकऱयांचे मार्गदर्शन 

प्रतिनिधी/ शिरोळ

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने येत्या गळीत हंगामापासून त्यांचे कार्यक्षेत्रात सेंदीय ऊस शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. या अंतर्गत कार्यक्षेत्रातील गांवात 500 एकर क्षेत्रावर हा प्रयोग राबविणेस सुरूवात केली आहे. यात सहभागी झालेल्या व सहकारी होवू इच्छिणाऱया ऊस उत्पादक सभासद शेतकऱयांसाठी प्रशिक्षण घेणेत आले. यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱयांनी गेली 10 ते 15 वर्षे सेंद्रीय शेती केली आहे. अशा शेतकऱयांचे अनुभव व मार्गदर्शन करणेत आले. याबरोबरच कृषि विद्यापीठाचे डॉ. जमदग्नी आदिनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने एम. आर. चौगुले पिंपळगाव कागल यांनी गेली 15 वर्षे सेंद्रीय शेतीचा उपक्रम राबविला आहे. हा उपक्रम राबवित असताना त्यांना आलेला अनुभव व त्यातून सेंद्रीय शेतीसाठी राबवायचे विविध मशागती, लागणी, सेंद्रीय खताचा वापर, पिकांचे निरीक्षण आदीबाबतचे मार्गदर्शन केले. याबरोबरच ऊस शेती करताना जमिनीची मेहनत, नांगरटी पासून सरी सोडणेपर्यंत करावयाच्या मेहनतीचे काम, ऊसाची लागण, त्यासाठी बीयाणाची निवड, या लागणीपूर्वी शेतीत विविध प्रकारची हिरवळीची खते घेवून त्याचे जमिनीत आच्छादन करावयाचे व जेणेकरून ऊसाचे क्षेत्रात निर्माण होणारी अन्य तृण नाशके, रोग आदीचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याबरोबरच ऊसाचे क्षेत्रातील दोन सरीतील अंतर हे 5 ते 8 फूटापर्यंत शेतकऱयांनी आपआपल्या सोईने ठेवावे. जेणेकरून ऊसातून हवा खेळेल, आंतरपीक घेता येईल. या आंतरपिकाचा निरनिराळी सेंद्रीय खते मिळण्यासाठी होत असतो. तसेच ऊसाचे पाचट पाला ऊसातील क्षेत्रात एकसरी आड आच्छादून ठेवावे. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. आदीबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ऊस लागणीपासून ऊस पक्व होवून तोडणी होईपर्यंत करावे, लागणारे सर्व व्यवस्थापन सेंद्रीय शेतीच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन केले.

राहुरी कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी म्हणाले, एम. आर. चौगुले यांनी स्वतः सेंद्रीय शेतीचा उपक्रम गेली अनेक वर्षे राबविला असून त्यांनी स्वअनुभवातून ही शेती केलेली आहे. त्यानी कथन केलेली सेंद्रीय शेतीबाबतची सर्व माहिती ही स्वअनुभवातून असली तरीसुद्धा ती शास्त्रशुद्ध पद्धतीची आहे याची माहिती त्यांनी दिली. सेंद्रीय शेती राबविणारा श्री दत्त शिरोळ हा एकमेव कारखाना आहे. या कारखान्याने भविष्यकाळात जमिनीची नापिकतेकडे होणारा कल व लोकांमध्ये आरोग्याच्यादृष्टीने होणारी जागरूकता विचारात घेवून हा प्रयोग हाती घेतलेला आहे. काही काळानंतर या कारखान्याचा सेंद्रीय शेतीबाबतचा आदर्श इतर कारखाने घेतील.

दानवाडचे कलगोंडा पाटील यांनी स्वतः कारखान्याच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीचा उपक्रम राबवित आहेत. त्यांनी आपले याबाबतचे अनुभव उपस्थितांना सांगितले. शेतकऱयांनी सेंद्रीय शेतीच्या अनुषंगाने विचारलेल्या शंकाचे निरसन एम. आर. चौगुले यांनी केले.

कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, एम. आर. चौगुले यांनी अनेक वर्षे सेंद्रीय शेतीचा करून प्रयोग राबविला आहे. त्याबद्दल व राहुरी कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्र डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांनी सेंद्रीय शेतीचा उपक्रम राबविणेसाठी वेळोवेळी शेतकऱयांना करीत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी उभयतांचे आभार मानले. त्यानंतर या उपक्रमासाठी सेंद्रीय शेती राबविण्या पाठिमागे जमिनीची रासायनिक खत, पाणी, प्रदुषण आदीमुळे नापिकतेकडे वाढणेचा कल दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जमिनीची उत्पादन क्षमता टिकवून ठेवायची असेल तर सेंद्रीय शेती प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. याबरोबरच सेंद्रीय शेतीतून उत्पादित होणारी उत्पादने ही सुद्धा मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असून दिवसेंदिवस वाढत चाललेले निरनिराळ्या रोगाचे प्रमाण सेंद्रीय शेतीतील उत्पानाच्या वापरामुळे निश्चितच कमी होणार आहे. याची जागृती दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढत चाललेली आहे. याचा फायदा शेतकऱयांबरोबर जनतेला, कारखान्याला होणार आहे. यातूनच कारखान्याने हा प्रकल्प हाती घेतलेला आहे. जे शेतकरी सेंद्रीय शेती राबवू इच्छितात त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य कारखाना करणार आहे. हा प्रकल्प राबवित असताना सुरूवातीला सर्वांनी आपल्या शेतीचे माती परिक्षण करून घ्यावे, तसेच आपली नांवे कारखान्याचे शेती विभागाकडे नोंदवावीत, अशीही विनंती त्यांनी केली.

स्वागत मुख्यशेती अधिकारी श्रीशैलय हेगाण्णा यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, संचालक विश्वानाथ माने, संजय पाटील, ऍड. प्रमोद पाटील, आण्णासाहेब पवार, विजय सूर्यवंशी, मलकारी तेरदाळे, दत्त भांडारचे अध्यक्ष दामोदर सुतार, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, शेती व ऊस विभागाकडील सर्व स्टाफ उपस्थित होता.

 

 

 

Related posts: