|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यात पदपूल कोसळून 30 जण नदीच्या पात्रात पडण्याची घटना

गोव्यात पदपूल कोसळून 30 जण नदीच्या पात्रात पडण्याची घटना 

वार्ताहर /काकोडा :

दक्षिण गोव्यातील कुडचडे शहरानजीक सावर्डेच्या बाजूने असलेला जुना पदपूल कोसळून त्यावरील सुमारे 30 लोक झुवारी नदीच्या पात्रात कोसळण्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. रात्री उशिरापर्यंत पाण्यात कोसळलेल्या लोकांना शोधण्याचे आणि बाहेर काढण्याचे कार्य चालू होते. काही लोक पोहून तीर गाठण्यात यशस्वी झालेले असून आठ जणांना वाचविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. रात्री 9 पर्यंत एक मृतदेह हाती लागला होता, मात्र आणखी काहींना मृत्यू आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर नदीत एका इसमाने आत्महत्येच्या उद्देशाने उडी मारली होती. हा इसम पाण्यात गटांगळय़ा खात असल्याची वार्ता पसरल्यानंतर त्याची कल्पना अग्निशामक दल, पोलिसांना देण्यात आली तसेच स्थानिक लोकही तेथे दाखल झाले. हे लोक सदर जुन्या पदपुलावर उभे राहून पाहत असताना त्याचा अर्धा भाग कोसळला आणि सदर लोक पाण्यात कोसळले. हा प्रकार सायंकाळी साडेसहाच्फा दरम्यान घडला.

सावर्डेतील झुवारी नदीवर नवा पूल बांधल्यानंतर जुना पूल तसेच त्याला भिडून असलेला हा जुना पोर्तुगीजकालीन पदपूलही बंद करण्यात आला होता. 2009 पासून हा पूल बंद होता. दरम्यान, ज्या इसमाने आत्महत्येच्या उद्देशाने पाण्यात उडी घेतली होती त्यालाही मृत्यू आल्याची माहिती मिळाली आहे. बचावकार्यासाठी नौदलाची मदत घेण्यात आली असून रात्री उशिरा दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे घटनास्थळी दाखल झाले होते.