संरक्षण मंत्री जेटलींकडून काश्मिरातील सुरक्षतेचा आढावा

वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू आणि काश्मीरच्या दौऱयावर असणाऱया संरक्षण आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी राज्यातील सुरक्षतेचा आढावा घेतला. जेटली यांनी उत्तर काश्मिरातील लष्करी अधिकाऱयांबरोबर बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेतला.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांची तयारी आणि त्यांची आक्रमकता पाहून संतोषजनक वाटले. कोणत्याही ‘नापाक’ कृत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपले सैनिक सदैव तयार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. बारामुल्ला विभागातील जीओसी मेजर जनरल आर. पी. कलिता यांच्याबरोबर ते लष्करी चौकीवर पोहोचत जेटली यांनी सैनिकांबरोबर चर्चा केली. यावेळी त्यांनी सैनिकांचे धैर्य, दृढ संकल्प आणि देशासाठी निस्वार्थपणे करीत असलेल्या सेवेची प्रशंसा केली.
लष्करी जवानाच्या कामगिरीबाबत संतोष व्यक्त करताना सध्याच्या कठीण वेळेतही जवान देशाचे निर्भयपणे संरक्षण करत असल्याने प्रत्येक देशवासियासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.