|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे » देशात सत्तेच्या केंद्रीकरणातून हुकूमशाहीचा डाव ! कन्हैयाकुमार

देशात सत्तेच्या केंद्रीकरणातून हुकूमशाहीचा डाव ! कन्हैयाकुमार 

प्रतिनिधी/ पुणे

राज्यघटना बदलण्यासाठी भाजप सरकार बहुमताच्या मागे लागले असून, एकाच व्यक्तीच्या हाती सत्ता देऊन सत्तेचे केंद्रीकरण केले जात आहे. याद्वारे दशात हुकूमशाही लादली जात असून, लोकशाही धोक्यात आल्याची भीती जेएनूय विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याने शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

यासंदर्भात बोलताना कन्हैया म्हणाला, देशात आघाडय़ांची सरकारे यापूर्वी असत. त्या नावावरून ती ओळखली जात. आता मात्र मोदी सरकार, योगी सरकार अशी व्यक्तिकेंद्री नावे दिली जात आहेत. यातून सत्तेचे केंद्रीकरण होत आहे. विविध कायदे करून त्यांचा विरोध करणाऱयांवर कारवाई केली जात असून,  हिंदूराष्ट्र आणण्याचा घाट घातला जात आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशामध्ये शेतकरी आत्महत्या, विद्यार्थी आत्महत्या, जवानांवर हल्ले, हिंसेच्या वातावरणात दिवसेंदिवस वाढ होत असून, लोकशाही धोक्यात आली आहे. देशातील प्रत्येक घटकाचे शोषण होत आहे. याकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. 

संसदेमध्ये घटना बदलण्यासाठी बहुमत मिळविण्याचा भाजपचा एकमेव उद्देश असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हे सरकार घटना आणि लोकशाहीवर घाला घालण्याचे काम करीत आहे. याविरोधात लढा उभारला असून, शेवटच्या क्षणापर्यंत लढा देत राहणार आहे. विरोधक आक्रमक नसल्याने तसेच सामाजिक आंदोलने तीव्र नसल्याने भाजपवर बंधन नाही. देशातील सर्व शैक्षणिक संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तींची नियुक्ती केली जात असून, सरकार यातून भगवेकरण करत आहे, असा गंभीर आरोपही त्याने केला.

राजकारणात येणार नाही

आपण भविष्यात कधीही सक्रीय राजकारणात उतरणार नाही, असे स्पष्टीकरण देत त्याने यासंबंधीच्या वृत्तपत्रांमधून होणाऱया चर्चांना पूर्णविराम दिला. भविष्यात कधीही राजकारणात जाणार नसून समाजातील प्रत्येक घटकासाठी लढत राहणार आहे, असे त्याने सांगितले.

मंत्र्याचा मुलगा सैन्यात दाखल झालाय का?

देशातील जवान सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना शहीद होतात. याच सीमेवर लढताना माझा भाऊदेखील शहीद झाला. देशातील कोणत्या मंत्र्याचा मुलगा सैन्य दलात दाखल झाला आहे का, असा सवालही त्याने केला. सरकारविरोधात बोलले तरी गुन्हा दाखल केला जातो, भविष्यात पतंजलीची वस्तू खरेदी न केल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतील, असा टोलाही त्याने भाजप सरकारला लगावला. पत्रकार परिषदेला तेहसीन पुनावाला, जिगनेश मेवानी, सेहला रशिद आदी उपस्थित होते.

Related posts: