|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुख्यमंत्र्यांनी अनुभवला जिल्हय़ाचा महसूली इतिहास

मुख्यमंत्र्यांनी अनुभवला जिल्हय़ाचा महसूली इतिहास 

प्रतिनिधी/ मिरज

नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित महसूली कागदपत्रांच्या प्रदर्शनातून मुख्यमंत्र्यांनी जिल्हय़ाच्या 250 वर्षांच्या इतिहासाची माहिती घेतली. ऐतिहासिक काळातील मोडी लिपीतील कागदपत्रे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. महसूली कागदपत्रांच्या या कायमस्वरूपी प्रदर्शनाबद्दल त्यांनी जिल्हाधिकीय शेखर गायकवाड यांचे कौतुक केले. या प्रदर्शनातून जिल्हय़ाचा महसूली इतिहासच डोकावत असल्याचे त्यांनी सांगितले.

   शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली-मिरज रोडवर उभारण्यात आलेल्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन केले. यानिमित्ताने कार्यालयात इतिहास काळातील महसूली कागदपत्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.   नूतन कार्यालयाच्या दर्शनी भागात हे प्रदर्शन कायमस्वरूप राहणार आहे. या प्रदर्श
नास 1773 सालापासूनची महसूलविषयक कागदपत्रे कलात्मक अशा डिजीटल बोर्डवर लावण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सांगली ब्रॅडिंग’ अतंर्गत ‘रंग महसूली’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये जिल्हय़ाशी संबंधीत ऐतिहासिक महसूली कागदपत्रांचे एक कायमस्वरूपी प्रदर्शन नूतन इमारतीत मांडण्यात आले आहे.

   या प्रदर्शनात जिल्हय़ात अंतभूर्त असणाऱया तत्कालीन सांगली, मिरज, बुधगांव, जत, औंध, इचलकरंजी या संस्थानाचे जुने स्टँम्प, तत्कालीन संस्थानांनी प्रसिध्द केलेली राजपत्रे, तत्कालीन गव्हर्नर आणि अन्य मान्यवरांनी दिलेल्या सांगलीभेटीविषयीच्या निमंत्रण पत्रिका, त्यावेळचे प्रोटोकॉल, जिल्हाधिकारी कार्यालयात 1960 पासून झालेल्या विविध कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिका यांचा समावेश आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहातील ही कागदपत्रे असून या कागदपत्रांच्या कलात्मक मांडणीसाठी प्रमोद चौगुले, प्रदीप सुतार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

    शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. देशातील अशा पध्दतीचे महसूली कागदपत्रांचे एकत्रिकरण एकाच ठिकाणी असलेले हे एकमेव कार्यालय असल्याचे जिल्हाधिकारी गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. या प्रदर्शनात मांडण्यात आलेली ऐतिहासिक मोडी कागदपत्रे पाहून मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी या प्रदर्शनातील काही मोडी कागदपत्रे मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर यांच्याकडून वाचून घेतली. त्यातून जिल्हय़ात असणारी सुमारे दोनशे वर्षापूर्वीची महसूल व्यवस्था समजावून घेतली. या प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत त्यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांचे कौतुक केले. या प्रदर्शनात मांडण्यात आलेली सर्व कागदपत्रे त्यांनी बारकाईने न्याहाळली. त्याबाबत प्रश्न विचारून मोडी कागदांमधील असणारा मजकूर जाणून घेतला.

Related posts: