|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क

कुडाळमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क 

कुडाळ : कुडाळ शहरात पाच दिवसांपूर्वी सापडलेल्या माकडाच्या मृत पिल्लाचा अहवाल केएफडी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

शनिवारी सकाळी जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, कुडाळ न. पं. च्या आरोग्य सभापती संध्या तेरसे यांनी मृत माकड ज्या शिवाजीनगर परिसरात सापडले, त्या भागाची पाहणी केली. दरम्यान, माकडताप साथ उद्भवू नये, यासाठी शहरासह परिसरात उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच माहितीसाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती देसाई व साळे यांनी दिली.

देसाई म्हणाले, 14 मे रोजी शिवाजीनगर भागात माकडाचे पिल्लू मृतावस्थेत आढळल्यानंतर वनविभाग, पशुवैद्यकीय विभाग व कुडाळ नगरपंचायत विभागाने त्याची दखल घेतली.

                        शहरात दक्षता

कुडाळ शहरात सर्व्हे सुरू केला असून उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. कुडाळ न. पं. च्या माध्यमातून माहिती पत्रके वाटून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच गोचीड पसरू नये, यासाठी पावडर फवारणी करण्यात येत असल्याचे देसाई यांनी सांगितले. शरीरावर गोचीड चढू नये, यासाठी डी. एम. पी. ऑईल शरीरावर लावायचे असून त्याचे वाटपही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

          मृत माकड सापडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

कुडाळ शहर व परिसरातील पाच कि.मी. भागातील गावांमध्ये मृत माकड सापडल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभाग, कुडाळ न. पं. ला कळवावे. कुडाळ ग्रामीण रुग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे नागरिकांनी माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या कक्षात नगरपंचायत, आरोग्य विभाग व वनविभागाचे प्रतिनिधी असतील, असे ते म्हणाले.

                    लोकांनी घाबरू नये

कुडाळ शहरात मृत माकड सापडले. पण, अद्याप माकडतापाचा रुग्ण आढळलेला नाही. लोकांनी या आजारापासून सावध राहवे. मात्र, घाबरू नये, असे आवाहन  देसाई व साठे यांनी केले. ताप किंवा तत्सम लक्षणे दिसल्यास कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावेत, असेही आवाहन करण्यात आले.

               गोचीड न पसरण्यासाठी दक्षता

मृत माकड सापडले तेथे व परिसरात गोचीड सापडली नाही. मात्र, त्या विषाणूचा फैलाव अन्य माकडांमध्ये झाल्याची शक्यता आहे. ती गोचीड अन्यत्र पसरू नये, याची दक्षता घेण्यात आल्याचे डॉ. साळे यांनी सांगितले. नगरपंचायत व आरोग्य विभागामार्फत भित्तीपत्रके व माहिती पत्रके वाटून जनजागृती केली जाईल, असे ते म्हणाले. नागरिकांनी समतोल आहार घ्यावा. रोगप्रतिबंधात्मक शक्ती वाढविण्यासाठी व्यायाम करावा. या आजारात प्लेटलेट कमी होतात. त्यामुळे ती दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ. साळे यांनी केले.

            कुडाळ रुग्णालयात चार खाटांचा विभाग

माकडतापाचे रुग्ण कुडाळात आढळले नाहीत. तरीही कुडाळ ग्रामीण रुग्णालयात चार खाटांचा विभाग तयार करण्यात आला आहे. बांबोळी-गोवा रुग्णालयाशी सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचा संपर्क असून गोवा येथे जाण्यासाठी अत्यावश्यक रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे डॉ. साळे म्हणाले. मृत माकड सापडले त्या पन्नास मीटर परिसरात फवारणी केल्याचे सांगून पूर्ण दक्षता घेतल्याचे स्पष्ट केले.

            तीन माकडांचे अहवाल पॉझिटिव्ह

 आतापर्यंत मृत 45 माकडांचे विच्छेदन करून त्याचा व्हिसेरा पुणे येथे पाठविला होता. त्यापैकी तीन माकडांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. साळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगून मृत माकड सापडले की, दक्षता म्हणून विच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवून तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येतो, असे स्पष्ट केले.

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात सध्या तीन डॉक्टर्स कार्यरत असून अद्याप माकडतापाचे रुग्ण सापडले नाहीत. त्यामुळे जास्त डॉक्टर दिले नसल्याचे ते म्हणाले. ज्या भागात माकडतापाचे रुग्ण सापडले, त्या भागात ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून लसीकरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

नगरसेवक सुनील बांदेकर, अश्विनी गावडे, सौ. सावंत, ओंकार तेली, राकेश कांदे, डॉ. पठाण तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारीही उपस्थित होते.