|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » माझ्याविरोधातील गुन्हा म्हणजे षड्यंत्रच

माझ्याविरोधातील गुन्हा म्हणजे षड्यंत्रच 

कणकवली : सांताक्रुझ पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात नोंदविण्यात आलेला गुन्हा हा माझ्या विरोधातील षड्यंत्राचा भाग आहे. एस्टेला रेस्टॉरंटमध्ये पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत धुमाकूळ सुरू असतो. या प्रकाराने त्रस्त झालेल्या स्थानिकांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. राणे यांनी याबाबत पोलीस आयुक्त, व मुंबई महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले होते. या रेस्टॉरंट संदर्भात माझ्यासोबत कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नसून तेथे गेलेल्या व्यक्तींशीही माझा कोणताही संबंध नसल्याचे आमदार नीतेश राणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

राणे यांनी पुढे म्हटले आहे की, एस्टेला नावाचे रेस्टॉरंट आमच्या जुहू येथील अधिशाला लागून आहे. एप्रिल महिन्यामध्ये जुहू भागातील रहिवाशांनी नारायण राणे यांच्याकडे येऊन रेस्टॉरंटमुळे होणाऱया त्रासाबाबत निवेदन दिले होते. या बाबत नारायण राणे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधल्यानंतर दोन महिन्यात कोणतीही कार्यवाही संबंधित खात्याकडून झालेली नाही. त्यामुळे जुहू येथील स्थानिकांच्या आग्रहास्तव मीदेखील या दोन्ही खात्यांकडे पाठपुरावा करत होतो.

18 मे रोजी पोलीस आयुक्तांना फोन करून याविषयी लक्ष वेधले होते. त्यानंतर आयुक्तांनी याबाबत तातडीने दखल घेण्याचेही मान्य केले होते. त्यामुळे या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर एस्टेला रेस्टॉरंटच्या संबंधितांनी माझ्याविरोधात खोटे  आरोप करत माझी बदनामी केल्याचे राणे यांनी म्हटले आहे. या रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड झालेली नाही. याप्रकरणी पोलीस तपासात मी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.