|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » बांगलादेशच्या विजयामध्ये सौम्या सरकारचे अर्धशतक

बांगलादेशच्या विजयामध्ये सौम्या सरकारचे अर्धशतक 

वृत्तसंस्था / डब्लीन

तिरंगी वनडे मालिकेतील येथे शुक्रवारी झालेल्या चौथ्या सामन्यात सौम्या सरकारच्या समायोचित अर्धशतकाच्या जोरावर (नाबाद 87) बांगलादेशने आयर्लंडचा 8 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात बांगलादेशला चार गुण मिळाले.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून आयर्लंडला  प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडचा डाव 46.3 षटकांत 181 धावांत आटोपला. त्यानंतर बांगला देशने 27.1 षटकांत 2 बाद 182 धावा जमवित विजय नोंदविला. या सामन्यात बांगलादेशच्या मुशफिकर रेहमान ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याने गोलंदाजीत 23 धावांत 4 गडी बाद केले.

आयर्लंडच्या डावात सलामीच्या जॉयसीने 3 चौकारांसह 46, नील ओब्रायनने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 30, डॉक्रेलने 1 चौकारांसह 25, कर्णधार पोर्टरफिल्डने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे एम. रेहमानने 23 धावांत 4 तर मुर्तझाने 18 धावांत 2 तसेच एस इस्लामने 22 धावांत 2 गडी बाद केले. आयर्लंडच्या डावात 2 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले.

बांगलादेशच्या डावात दमदार सुरूवात झाली. तमीम इक्बाल आणि सौम्या सरकार या जोडीने 13.5 षटकांत 95 धावांची भागिदारी पहिल्या गडय़ासाठी केली. इक्बालने 6 चौकारांसह 47 धावा जमविल्या. इक्बाल बाद झाल्यानंतर सरकार आणि शबीर रेहमान यांनी दुसऱया गडय़ासाठी 76 धावांची भर घातली. रेहमानने 34 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 35 धावा जमविल्या. सरकारने 68 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 87 धावा जमवित आपल्या संघाला 8 गडय़ांनी विजय मिळवून दिला. आयर्लंडतर्फे मॅकार्थी आणि के. ओब्रायन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या स्पर्धेत आता बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात जेतेपदासाठी लढत अपेक्षित आहे. हा अंतिम सामना येत्या बुधवारी होईल. या स्पर्धेतील आयर्लंडचा पुढील सामना न्यूझीलंड संघाविरूद्ध रविवारी होणार आहे.

संक्षिप्त धावफलक

आयर्लंड 46.3 षटकांत सर्वबाद 181 ( जॉयसी 46, एन.ओब्रायन 30, डॉक्रेल 25, पोर्टरफिल्ड 22, एम. रेहमान 4 बळी, एस. इस्लाम आणि मुर्तझा प्रत्येकी 2 बळी)., ब्ाांगलादेश 27.1 षटकात 2 बाद 182 (सौम्या सरकार नाबाद 87, तमीम इक्बाल 47, शबीर रेहमान 35).