|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बॉक्साईट घेवून जाणाऱया ट्रकच्या अपघातात महिलेचा मृत्यू, पाच जखमी

बॉक्साईट घेवून जाणाऱया ट्रकच्या अपघातात महिलेचा मृत्यू, पाच जखमी 

प्रतिनिधी/ राधानगरी

निपाणी-फोंडा राज्य मार्गावर भरधाव बॉक्साईट घेवून जाणाऱया ट्रकने धडक दिल्याने पुण्यातील एक महिला ठार झाली असून पाच जण जखमी झाले आहेत. धडक एवढी जोराची होती की झायलो गाडीतील जखमींना काढताना दरवाजा तोडून बाहेर काढावे लागले. या मार्गावर बॉक्साईट चालकांच्या भरधाव वेगाला आणखीन किती बळी गेल्यावर चाप लागणार असा संतप्त सवाल प्रवाशी वर्गातून विचारला जात होता.

बॉक्साईट घेवून एमएच 43 ई 3580 हा ट्रक राधानगरीकडून मुदाळ तिट्टय़ाकडे चालला होता. तर पुण्याहून एमएच 12 केएल 1641 ही झायलो गाडी गैबी तिट्टय़ाकडून गोव्याकडे चालली होती. दरम्यान गैबी पेट्रोलपंपाच्या पुढील बाजूच्या वळणावर भरधाव जाणाऱया ट्रक चालकाने झायलो गाडीला जोराची धडक दिली. यामध्ये गाडीचा चालकाकडील बाजूचा चक्काचूर झाला. यामुळे आतील प्रवाशांना गाडीची दारे उचकटून बाहेर काढावे लागले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. तर गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच राधानगरीचे पोलिस निरिक्षक एस. एस. सुर्वे तात्काळ सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. गाडीतील जखमींना बाहेर काढून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. रस्त्यात आडवी असलेली वाहने काढून वाहतूक पुर्ववत सुरू केली. घटनास्थळी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.

या मार्गावरील रस्त्याचे रूंदीकरण झाले आहे. तरीही बॉक्साईट वाहतूकदारांची जीवघेणी स्पर्धा अनेकांच्या जीवावर उठत आहे. गेल्या काही वर्षात बॉक्साईट वाहतूक करणाऱया ट्रकांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेकांना आपला  जीव गमवावा लागला आहे. तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे. यामुळे या मार्गावर जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागत आहे. बेताल वाहतूक करणाऱया चालकांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी घटनास्थळी प्रवाशी वर्गातून बोलली जात होती.

Related posts: