|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » औषध फवारणी करणाऱया पालिका कर्मचाऱयाचा मृत्यू

औषध फवारणी करणाऱया पालिका कर्मचाऱयाचा मृत्यू 

वार्ताहर/ निपाणी

निपाणी नगरपालिकेत कंत्राटदाराच्या माध्यमातून सफाई कामगार म्हणून काम करणाऱया कर्मचाऱयाचा औषध फवारणी करताना झालेल्या त्रासातून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 12 च्या सुमारास घडली. रणजीत सदानंद कांबळे (वय 33, रा. जत्राटवेस) असे मृताचे नाव आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, रणजीत कांबळे हा 16 महिन्यांपासून जय मंगल एजन्सीकडे कंत्राटी पद्धतीने काम करत होता. शनिवारी सकाळी शिंत्रे कॉलनी परिसरात डास, माशी प्रतिबंधक औषध फवारणी सुरू होती. औषध फवारणी करत असताना 11 च्या सुमारास रणजीत याला चक्कर येण्यासह त्रास जाणवू लागला. यातून श्वासोच्छवास घेण्यासही अडथळा होऊ लागला.

होणारा त्रास लागलीच त्याने आपले मुकादम व अधिकाऱयांना सांगितला. यानंतर तातडीने गांधी रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. पण श्वासोच्छवास घेण्याचा त्रास अधिकच वाढत होता. व्हेंटिलेटर लावण्याची गरज निर्माण झाल्याने निपाणीत सुविधा उपलब्ध नसल्याने कोल्हापूरला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण कोल्हापुरात पोहोचण्याआधीच रणजीतचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह गांधी रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेविषयी निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास फौजदार सुनील पाटील करत आहेत. रणजीतच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Related posts: