|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » ती फुलराणी नाटकाचे शतक

ती फुलराणी नाटकाचे शतक 

प्रत्येक पिढीतल्या निर्मात्या-दिग्दर्शकाला भुरळ घालणाऱया ती फुलराणी या अजरामर कलाकृतीला आजवर उदंड प्रेक्षकवर्ग लाभला. अशावेळी ती फुलराणी हे नाटक नव्या रुपात आणि नव्या संचात घेऊन येण्याचं शिवधनुष्य लेखक नाटय़दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी उचललं आणि अवघ्या काही दिवसांतच या नाटकाने शंभराव्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल केली. हे नाटक सध्या महाराष्ट्रात हाऊसफुल चालू आहे. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे या नाटकाने 99 यशस्वी प्रयोग पार पाडले आणि रविवारी या नाटकाचा शंभरावा प्रयोग विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहामध्ये पार पडला. या नाटकाच्या यशात निर्माते लीना जुवेकर-दत्तगुप्ता आणि राहुल जुवेकर यांचा ही मोलाचा वाटा आहे.

दीनानाथ नाटय़गफहात ती फुलराणीच्या शंभराव्या प्रयोगाचा आनंद उत्सव रंगला. या शंभराव्या प्रयोगासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले होते. नाटकाच्या संपूर्ण टीमचा मानचिन्ह देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. रसिकांना पुनर्प्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱया ती फुलराणीच्या संपूर्ण टीमचे सध्या नाटय़रसिकांकडून कौतुक होत आहे. अशावेळी या नाटकाचा इतक्या कमी अवधीत होणारा हा शतक महोत्सवी प्रयोग खरोखरच अभिनंदनीय आहे. अचाट, अफाटपूर्ण उर्जा असलेल्या या फुलराणीचा दरवळ उत्तरोत्तर अशाच बहरेल हे निश्चित अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. ऍडोनिस मल्टीमिडिया ऍण्ड एण्टरटेन्मेंट प्रा.लि निर्मित ‘ती फुलराणी’ या नाटकात फुलराणीच्या भूमिकेतील हेमांगी कवी आणि प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ. गिरीश ओक आहेत. सोबत विजय पटवर्धन, सुनील जाधव, दिशा दानडे, अंजली मायदेव, मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, निरंजन जावीर, हरीश तांदळे हे कलाकार आहेत. सूत्रधार नितीन नाईक आहेत.