|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीय नौदलाने घेतला मालदीवच्या जहाजाचा शोध

भारतीय नौदलाने घेतला मालदीवच्या जहाजाचा शोध 

दुर्घटनेनंतर 3 दिवस होते बेपत्ता : 6 जणांचा वाचविला जीव

वृत्तसंस्था / माले

मालदीवचे जहाज दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर 3 दिवसांपासून बेपत्ता होते. या जहाजाला भारतीय नौदलाने शोधून काढले आहे. लँडिंग क्राफ्ट मारिया-3 च्या चालक दलाच्या 6 सदस्यांचा जीव नौदलाने वाचविला आहे. जहाजाचा पुढील भाग तुटल्याने पुढील प्रवास करण्यास ते अक्षम ठरले होते.

मारिया-3 दोन बेटांदरम्यान पोहोचले असता बेपत्ता झाले होते. भारतीय नौदलाने आयएनएस किर्च आणि आपल्या ड्रोन विमानाद्वारे शनिवारी मालदीवच्या जहाजासाठी शोध आणि बचाव मोहीम राबविली.

अशी राबविली बचाव मोहीम

नौदलाने आधी ड्रोन विमानाला मालदीवच्या जहाजाचा ठावठिकाणा शोधून काढण्याच्या मोहिमेवर पाठविले. या प्रयत्नांतर्गत जहाज मालेपासून 120 सागरी मैल अंतरावर असल्याचे समजले. यानंतर नौदलाने घटनास्थळासाठी आयएनएस किर्च रवाना करून आवश्यक मदत जहाजापर्यंत पोहोचविली. आयएनएस किर्चने मालदीवच्या जहाजावरील सर्व सदस्य सुरक्षित असल्याची पुष्टी दिल्याचे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी.के. शम यांनी सांगितले.

मालदीवचे लँडिंग क्राफ्ट

18 मे रोजी मारिया-3 मालदीवच्या थुलसधू बेटावरून एल गान बेटासाठी निघाले होते. याच प्रवासादरम्यान हे जहाज बेपत्ता झाले होते. मालदीवमधील भारतीय राजदूत अखिलेश मिश्रा यांनी बेपत्ता जहाजाचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदल आणि मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षा दलामधील ताळमेळ आणि सहकार्याचे कौतुक केले आहे. भारतीय नौदलाच्या अधिकाऱयांचे शौर्य, सेवेबाबत समर्पण आणि त्यांच्या व्यावसायिक वृत्तीवर मला गर्व आहे. याप्रकारच्या आव्हानात्मक हवामानात नौदलाने ज्याप्रकारे बचाव मोहीम राबविली ते कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.