|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » इस्लामपुरात घरफोडीत अडीच लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास

इस्लामपुरात घरफोडीत अडीच लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

येथील ताकारी रस्त्यावरील मंडले मळ्यातील अनिल नामदेव महाजन यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी लोखंडी कपाटातील सुमारे अडीच लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. यामध्ये रोख पंधरा हजार रुपयांचा समावेश आहे. पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. मात्र श्वान घरापासून काही अंतरावर जावून घुटमळले.

महाजन हे मूळ गवळीवाडी, ता. चाळीसगाव जि. जळगाव येथील असून ते वीज वितरण कंपनीत बोरगाव येथे कार्यरत आहेत. ते ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कुल शेजारील मंडले मळ्यातील रेवणनाथ मंडले यांच्या चाळीतील घरात भाडय़ाने राहत होते. त्यांनी नुकतेच यशोधननगर येथे घर बांधकाम केले असून शनिवारी या घराचा वास्तुशांत समारंभ होता. त्यामुळे मंडले मळ्यातील घराला कुलूप लावून महाजन कुटुंबिय या नव्या घरात मुक्कामाला थांबले होते. त्याचा लाभ उठवत चोरटय़ांनी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटात सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने 94 भार चांदीचे दागिने व बांधकाम मजूरांसाठी ठेवलेले रोख पंधरा हजार रुपये चोरटय़ांच्या हाती लागले. दरम्यान चोरटय़ांनी कपाटातील कपडे व अन्य साहित्य अस्ताव्यस्त विस्कटले होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महाजन हे आपल्या भाडय़ाच्या घराकडे गेले असता, चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सोन्यांच्या दागिन्यामध्ये गंठण, चेन, अंगठी, झुबे या ऐवजाचा समावेश आहे.

महाजन यांनी या प्रकरणी सकाळीच इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. पोलीसांनी श्वान पथक मागवले. तसेच ठसे तज्ञांनाही पाचारण केले. चोरटय़ांनी हाताळलेल्या वस्तुंचा श्वानाला वास देण्यात आला. या श्वानाने घरापासून बाहेर पडून ताकारी रस्त्यावरील मंडले यांच्या दुकान गाळ्यापर्यंत माग दाखवला. व तिथेच घुटमळले. ठस्से मिळून आले नाहीत.

पोलीस उपाधिक्षक किशोर काळे, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी घटनास्थळी भेट दिली. काळे यांनी तपासाबाबत मार्गदर्शन केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरु करीत आहेत.

Related posts: